तडीपार शहरात आला, तलवार घेऊन फिरला अन् जाळयात अडकला
By दयानंद पाईकराव | Updated: April 14, 2024 20:30 IST2024-04-14T20:29:54+5:302024-04-14T20:30:06+5:30
आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता त्याला ३० जून २०२३ रोजी शहरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचे उघड झाले.

तडीपार शहरात आला, तलवार घेऊन फिरला अन् जाळयात अडकला
नागपूर : तडीपार असताना शहरात येऊन हातात तलवार घेत धुमाकुळ घालणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी गजाआड केले आहे. हर्ष प्रितसिंग उर्फ अनमोलसिंग हरमितसिंग सलुजा (२२, रा. राय गॅलेक्सी अपार्टमेंट, बाबा बुद्धाजीनगर, पाचपावली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पाचपावली पोलिसांचे पथक गुन्हेगाराच्या शोधात रविवारी १४ एप्रिलला सकाळी ११.१५ वाजता गस्त घालत होते. दरम्यान त्यांना एक आरोपी बाळाभाऊपेठ, दुर्गा मंदिरसमोर, बापु कुटीनगर येथे सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन धुमाकुळ घालत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन आरोपी हर्षला तलवारीसह ताब्यात घेतले.
आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता त्याला ३० जून २०२३ रोजी शहरातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचे उघड झाले. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५, १४२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.