घुमानला बहुभाषिक साहित्य संमेलन

By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:51+5:302016-03-16T08:39:51+5:30

पंजाबमधील घुमान येथे ८८ वे अ.भा. साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेच्या आणि राज्यांच्या सीमा ओलांडून गेली. या

Swirling Multilingual Literature Meetings | घुमानला बहुभाषिक साहित्य संमेलन

घुमानला बहुभाषिक साहित्य संमेलन

नागपूर : पंजाबमधील घुमान येथे ८८ वे अ.भा. साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेच्या आणि राज्यांच्या सीमा ओलांडून गेली. या काळात आपली भाषा जगली आणि सामर्थ्यवान झाली पाहिजे. हा पूर्वीपासूनच असलेला विचार अधिक बळावला. याच विचारातून दरवर्षी घुमान येथे बहुभाषिक साहित्य संमेलन घेतले जावे, अशी कल्पना समोर आली. सरहद संस्थेने पुढाकार घेत ३ व ४ एप्रिल रोजी पहिले बहुभाषिक साहित्य संमेलन घुमान येथे आयोजित केले आहे. हे संमेलन दरवर्षी घुमान येथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. भारतीय भाषा जोडण्याचे आणि समन्वयाचे काम देशभरात विविध स्तरावर केले जाते. या कामाला संघटित स्वरूप देण्याचा हा प्रयत्न संत नामदेवांच्या कर्मभूमीत होतो आहे, अशी माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण नेवासकर आणि संयोजन समितीप्रमुख डॉ. गिरीश गांधी यांनी दिली.
संमेलनाचे पहिलेच वर्ष असल्याने प्रतिसाद कमी असेल असे वाटले; पण देशाच्या विविध भागातून संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विविध भाषांचे १०० पेक्षा जास्त महत्त्वाचे ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी यासाठी नोंदणी केली आहे, असे गिरीश गांधी म्हणाले. निमंत्रक म्हणून राजन खान यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेशदेवी यांनी स्वीकारल्यामुळे या संमेलनाला विशेष वलय मिळाले आहे.
जयपूर, हैदराबाद येथे साहित्याचे उत्सव होतात त्याच धर्तीवर घुमान हे या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक वैचारिक केंद्र होईल. यात साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, पंजाबी अकादमी यासारख्या संस्थांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाला पंजाब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. श्यामची आई फाऊंडेशन आणि सरहद यांच्यावतीने दरवर्षी साने गुरुजी राष्ट्रीय भाषा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
२५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. या पुरस्कारांची घोषणाही लवकरच करण्यात येईल, असे भारत देसडला यांनी सांगितले. पुढील आठवड्यात या संमेलनाची पत्रिका जाहीर करण्यात येईल, अशी माहिती गिरीश गांधी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Swirling Multilingual Literature Meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.