सातारा आणि सांगलीहून आला अमरावतीत ‘स्वाईन फ्लू’

By Admin | Updated: August 10, 2014 01:24 IST2014-08-10T01:24:09+5:302014-08-10T01:24:09+5:30

‘स्वाईन फ्लू’ आजाराने शहराच्या नमुना परिसरातील विनोद गणोरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मृताने सातारा व सांगली भागात केलेल्या

'Swine Flu' from Amravati, Satara and Sangli | सातारा आणि सांगलीहून आला अमरावतीत ‘स्वाईन फ्लू’

सातारा आणि सांगलीहून आला अमरावतीत ‘स्वाईन फ्लू’

प्रवासात लागण : गणोरकरांची दोन्ही फुफ्फुसे झाली होती निकामी
वैभव बाबरेकर - अमरावती
‘स्वाईन फ्लू’ आजाराने शहराच्या नमुना परिसरातील विनोद गणोरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मृताने सातारा व सांगली भागात केलेल्या प्रवासातून हा भयंकर आजार अमरावती शहरापर्यंत आला असावा, असा अंदाज अमरावती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी एस.आर.सोनी यांनी सांगितले.
नमुना परिसरातील तिसऱ्या क्रमांकाच्या गल्लीतील रहिवासी मृत विनोद गणोरकर हे कुरिअर सर्व्हीसमध्ये कार्यरत होते. या कामानिमित्त त्यांना राज्यभर प्रवास करावा लागत असे. १२ जुलै रोजी विनोद गणोरकर सातारा जिल्ह्यातील गोंडवणे या धार्मिकस्थळी त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. या गर्दीतून कसरत करीत त्यांनी गुरूंचे दर्शन घेतले. त्यानंतर दोन दिवसांनी ते अमरावतीत परतले. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांनतर विनोद गणोरकर सांगली येथे त्यांच्या मुलाच्या भेटीसाठी गेले. यावेळी त्यांनी वाशिम- सांगली हा प्रवास एका खासगी ट्रॅव्हल्समधून केला. ही गाडी वातानुकूलित असल्याने त्यांना सर्दीचा त्रास जाणवू लागला. सांगलीहून अमरावतीला परतल्यानंतर मात्र त्यांची त्यांची सर्दी अधिकच वाढली. सर्दीसाठी त्यांनी नमुना परिसरातील त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यामुळे त्यांनी शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू केले. एक वर्षापूर्वी याच रूग्णालयात त्यांच्यावर निमोनियासाठी उपचार झाले होते. एका वर्षा आधी विनोद गणोरकर यांना निमोनिया झाला होता. या खासगी रूग्णालयातील उपचारांनाही विनोद गणोरकर प्रतिसाद देत नसल्याने येथील डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा एक्स-रे काढला. त्यामध्ये विनोद यांच्या फुफ्फुसाच्या एका बाजुला निमोनियाचा प्रादुर्भाव आढळून आला. फुफ्फुसांचा त्रास वाढल्याने त्यांच्या श्वासोच्छवासात अडथळे येऊ लागल्याने त्यांना नागपूरला हलविण्याचा सल्ला येथील खासगी डॉक्टरांनी दिला. दुसऱ्या दिवशी लगेच विनोद यांना नागपूर येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, तोपर्यंत विनोद यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी होऊन त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. तेथील डॉक्टरांनी विनोद यांना ‘टॅमी फ्लू’ देणे सुरु केले होते.
परंतु उपचार सुरू असतानाच गुरूवारी विनोद गणोरकर यांचा मृत्यू झाला. विनोद यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता विनोद गणोरकर ‘स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचे वृत्त प्रकाशित होताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग आला आहे.

Web Title: 'Swine Flu' from Amravati, Satara and Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.