Sweet sugar is harmful to health | आरोग्यासाठी घातक आहे साखरेचा गोडवा

आरोग्यासाठी घातक आहे साखरेचा गोडवा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर: साखरेचा (शुगर) आरोग्याच्या स्तरावर विचार केल्यास सिगारेटच्या समतुल्य ठेवावे लागेल. साखरेचे प्रमाण वाढवल्यास इन्सुलिनचा स्राव वाढतो. इन्सुलिन साखरेला वसामध्ये परिवर्तित करते, जी लिव्हरमध्ये जमा होत राहते. त्यामुळे, साखर ग्रहण करणे व्यसनात रूपांतरित होते. प्रयोगशाळेत उंदरावर केलेल्या प्रयोगात ९३ टक्के उंदरांनी कोकिनऐवजी साखरेच्या पाण्याला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. साखरेचे अमर्यादित सेवन धूम्रपान आणि मॅरिजुआनाच्या सेवनापेक्षाही घातक आहे. साखर असलेल्या आहाराच्या सेवनाने तुमच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे.

साखरेचे व्यवसन जडण्याचे चक्र कोणते

साखर ग्रहण करण्याचे व्यसन जडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. हे व्यसन जडल्यास प्रत्येक वेळी काहीतरी गोड खाल्लेच पाहीजे, असे वाटायला लागते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास मेंदूतून डोपेमाईनचे स्राव वाढायला लागते. इन्सुलिन मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे साखरेला लिव्हरमध्ये वसा म्हणून जमा व्हायला मदत होते. त्यानंतर शरीराला साखरेची गरज प्रचंड वाटायला लागते. ब्लडशुगर कमी झाल्यावर मोठ्या प्रमाणात साखर खाण्याची इच्छा उत्पन्न व्हायला लागते आणि भूकेचे प्रमाणही वाढायला लागते. हे चक्र सातत्याने सुरू असते.

साखरेला गोड विष का म्हटले जाते

रिफाईन्ड शुगरचा वापर वाढण्यासोबतच मधुमेह आणि संबंधित अन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. मानवी शरीर मानवानेच बनविलेल्या साखरेला सहन करू शकत नाही. साखर आपल्या मेंदूत एक रसायन बिटा एण्डोर्फिन्सची मात्रा वाढवत असते. ही मात्रा लठ्ठपणा आणि इन्सुलिनसाठी प्रतिरोधक शक्तीचे कारण ठरते. साखरेची अतिरिक्त मात्रा हृदयाचे आजार, लिपिड समस्या, हायपरटेन्शन, टाईप २ मधुमेह, डिमेन्शिया, कर्करोग, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोम आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचे कारण असते.

साखरेमुळे उत्पन्न होणाऱ्या अन्य समस्या

हृदयाला आघात देण्यासोबतच कंबरेजवळ मेद वाढण्याचे कारण साखर आहे. ही स्थिती इन्सुिलन रेजिस्टेन्सला कारण ठरते. खरेतर साखर ही एक सायलेंट किलर आहे, जी कर्करोग आणि कर्करोग वृद्धिंगत होण्यास कारणीभूत ठरते. अनेकदा साखरेबाबतची गोडी अनुवांशिक असू शकते. साखर तुमच्या मेंदूची ऊर्जा कमी करते. साखर आणि अल्कोहोलचा लिव्हरवरील दुष्परिणाम जवळपास एकसारखाच असतो. साखर अधिक खाल्ल्याने दैनंदिन जीवनमानाची गती कमी करते आणि आपल्याला लठ्ठ बनविण्यास मदत करीत आहे.

साखर घातक तर फळे लाभदायक का

फळ हे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे उत्तम स्रोत आहेत. त्यातून फायबरही मिळतात. पोटॅशियमचे उत्तम स्रोत असण्यासोबतच फळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. फळांमध्ये असलेल्या फ्लेवोनॉईड्समुळे कार्डियोव्हॅस्क्युलर आजाराचा धोका कमी होतो. फळे आपल्या आरोग्याचे संतुलन राखतात आणि अन्य खाद्यपदार्थांच्या सेवनापासून बचाव करतात. बरेचदा फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याचाच सल्ला दिला जातो. त्यातही भाज्या खाण्यावरच भर दिला जातो. दररोज भाज्यांसोबतच किमान दोन फळ खाणे गरजेचे आहे, हे महत्त्वाचे.

नैसर्गिक साखर ॲडेड साखरेपेक्षा चांगली आहे का

नैसर्गिक साखर केळ व अन्य फळ, दुधासारख्या अनप्रोसेस्ड खाद्यपदार्थांतून मिळते. यात कॅलरी आणि सोडियमची मात्रा कमी असते आणि पाण्याची मात्रा भरपूर असते. सोबतच अनेक महत्त्वाचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सही असतात.

दिवसाला साखर किती घ्यावी

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या निष्कर्षानुसार, महिलांनी एका दिवसात ६ चमचे किंवा २५ ग्रॅम किंवा १०० कॅलरी आणि पुरुषांनी ९ चमचे साखर घेणे योग्य आहे.

साखरेमुळे बालकांना होणारे नुकसान

पालक म्हणून मुलांना प्रोत्साहनादाखल चॉकलेट्स, मिठाई आदी देण्याची परंपरा आहे. लहानपणापासूनच मुलांना पोषण आहाराबाबत प्रोत्साहित करण्याची गरज आहे. साखरेच्या अतिग्रहणाने मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. सोबतच वय वाढताना मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन आजाराचा धोका असतोच. वजन वाढल्याने सांधेदुखी, गाऊट आणि फॅटी लिव्हरची समस्याही फोफावू शकते. त्यामुळे मुलांच्या आहारात पोषणाला प्राधान्य द्यावे.

फ्री शुगर्स काय आहे

खाद्यान्न किंवा ड्रिंकमध्ये नंतर मिसळण्यात येणाऱ्या साखरेला फ्री शुगर म्हणतात. यात बिस्किट, चॉकलेट, सुगंधित दही, न्याहारी, सॉफ्ट ड्रिंक्सचा समावेश होतो. मध, सिरपमध्ये असलेल्या साखरेलाही फ्री शुगर म्हटले जाते. दूध आणि फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेचा यात समावेश होत नाही.

दात खराब होण्याचा साखरेशी काय संबंध

दात खराब होण्याचे प्रमुख कारण साखरच आहे. फ्री शुगरवाल्या खाद्यसामग्रीचे प्रमाण कमी केल्यास दाताच्या आरोग्यातील बदल स्पष्टपणे दिसून येईल. मिठाई, चॉकलेट, केक, बिस्किट, जेम, मध यामुळेसुद्धा दात खराब होतात. फळ आणि भाज्यांमुळे दात खराब होत नाहीत.

हे गरजेचे नाही की मधुमेहींनीच साखर टाळावी. सर्वसामान्यांनीही आहारातील साखरेचे प्रमाण कमी केल्यास भरपूर फायदे आहेत. यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी होते. भूक वाढण्यास आणि अन्य काही खाण्याची इच्छाही यामुळे वाढते. साखरेचे प्रमाण कमी केल्यास ऊर्जा वाढते आणि मानसिक सजगता वृद्धिंगत होते. दाताचे आरोग्यही यामुळे चांगले राहते. साखरेचे अतिप्रमाण विषासारखेच आहे. त्यामुळे साखर टाळणेच योग्य ठरेल.

 

Web Title: Sweet sugar is harmful to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.