नागपुरात घडलेल्या पाच न्यायमूर्तींचा शपथविधी ठरला अभिमानाचा क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 20:54 IST2021-06-01T20:52:38+5:302021-06-01T20:54:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात जडणघडण झालेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती विरेंद्रसिंग ...

नागपुरात घडलेल्या पाच न्यायमूर्तींचा शपथविधी ठरला अभिमानाचा क्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात जडणघडण झालेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती विरेंद्रसिंग बिष्ट, न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर व न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचा शपथविधी संपूर्ण विदर्भाकरिता अभिमानाचा क्षण ठरला. मंगळवारी पार पडलेल्या या शपथविधीचे यूट्युबवर प्रसारण करण्यात आले. त्यामुळे असंख्य नागरिकांना हा शपथविधी पाहता आला.
नियुक्तीपासून केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे या पाचसह एकूण १० अतिरिक्त न्यायमूर्तींना सेवेत कायम करण्यात आले आहेे. यासंदर्भात २७ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. या सर्वांना मंगळवारी कायम न्यायमूर्ती म्हणून शपथ देण्यात आली. कोरोना संक्रमणामुळे सर्वांना मुंबईत न बोलावता ते सध्या कार्यरत आहेत, त्याच ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला. उच्च न्यायालयाच्या मुख्यालयात न्या. बिष्ट व न्या. बोरकर, नागपूर खंडपीठात न्या. घरोटे व न्या. किलोर तर, गोवा खंडपीठात न्या. जवळकर यांनी शपथ घेतली. त्यांना अनुक्रमे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, नागपूर खंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती सुनील शुक्रे व गोवा खंडपीठातील ज्येष्ठ न्यायमूर्ती सुरेश गुप्ते यांनी शपथ दिली. न्या. घरोटे व न्या. किलोर यांची २३ ऑगस्ट २०१९ तर, न्या. बिष्ट, न्या. जवळकर व न्या. बोरकर यांची ५ डिसेंबर २०१९ रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. न्या. घरोटे व न्या. जवळकर हे दोघे नागपूर, न्या. किलोर हे अमरावती, न्या. बिष्ट हे जालना तर, न्या. बोरकर हे गोंदिया जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.