आरएफओ, फॉरेस्टर निलंबित
By Admin | Updated: July 2, 2014 00:53 IST2014-07-02T00:53:06+5:302014-07-02T00:53:06+5:30
पवनी वनपरिक्षेत्रातील पुसदा जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या अवैध कटाईप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) व वनपालासह (फॉरेस्टर) तिघांविरुद्ध निलंबन कारवाई करण्यात आली आहे.

आरएफओ, फॉरेस्टर निलंबित
पवनी येथील अवैध वृक्षतोड : वन विभाग इतर आरोपींच्या शोधात
नागपूर : पवनी वनपरिक्षेत्रातील पुसदा जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या अवैध कटाईप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) व वनपालासह (फॉरेस्टर) तिघांविरुद्ध निलंबन कारवाई करण्यात आली आहे. यात पवनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी मदनलाल जायस्वाल, वनपाल एस. आर. लांजेवार व बीटरक्षक टी. एस. मोहम्मद यांचा समावेश आहे. माहिती सूत्रानुसार सोमवारी चौकशी अधिकारी तथा विभागीय वन अधिकारी (दक्षता) प्रदीप मसराम यांनी या संपूर्ण प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट तयार करून तो मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) शैलेष टेंभूर्णीकर यांच्याकडे सादर केला. त्यावर टेंभूर्णीकर यांनी लगेच आरएफओ व फॉरेस्टरच्या निलंबनाचे आदेश जारी केले. शिवाय वनरक्षकाला निलंबित करण्याचा अधिकार हा उपवनसंरक्षक यांना असल्यामुळे मसराम यांनी चौकशी अहवालाची दुसरी प्रत पी. के. महाजन यांच्याकडे सादर केली. त्याआधारे महाजन यांनी सायंकाळी उशिरा बीट वनरक्षक टी. एस. मोहम्मद यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
प्रेमलाल तसमेर नावाच्या एका खाजगी ठेकेदाराने गत १५ दिवसांपूर्वी पुसदा येथील संरक्षित जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची अवैध कटाई केली आहे. मात्र असे असताना संबंधित आरएफओ, फॉरेस्टर व वनरक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु गत २६ जून रोजी आरोपी ठेकेदार हा त्या लाकडाची वाहतूक करताना वन विभागाच्या जाळ्यात अडकला. यानंतर त्याला लगेच अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र संबंधित वन अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तो लगेच जामिनावर बाहेर आला. संबंधित वन अधिकाऱ्यांनी न्यायालयासमक्ष जाणिवपूर्वक वन विभागाची ठोस बाजू मांडली नसल्याचा आरोप आहे. त्याचा ठेकेदाराला जामीन मिळण्यास फायदा झाला. दुसरीकडे वन विभागाचे एक पथक या गोरखधंद्यातील इतर आरोपींचा शोध घेत आहे. (प्रतिनिधी)