लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आरोपात संशयीत म्हणून पकडला गेलेला आणि विनाकारण बदनाम झालेल्या आकाश नामक तरुणाचा या प्रकरणाशी काडीचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत झालेल्या चाैकशीने त्याची पुरती त्रेधातिरपट उडवली होती. आपण केले काय अन् झाले काय, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे आता पुन्हा 'डब्ल्यूटी' जाणार नाही, असे तो वारंवार ओरडून सांगत होता. खरा आरोपी पोलिसांच्या हाती लागेपर्यंतच्या घटनाक्रमाची शिर्षस्थ सूत्रांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.
देशभर चर्चेला आलेल्या या प्रकरणातील संशयीत ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने कोलकाताकडे पळून जात असल्याचा मेसेज शनिवारी दुपारी मुंबई पोलिसांकडून नागपूर, रायपूर विभागातील रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाला मिळाला. त्यामुळे रेल्वेची यंत्रणा खडबडून कामाला लागली होती. कथित संशयीताला दुर्ग आरपीएफने धावत्या गाडीत पकडले आणि शनिवारी रात्री देशभरात हे वृत्त प्रसिद्ध झाले. तिकडे संशयीत आरोपी सापडल्याची माहिती कळताच मुंबई पोलिसांचे विशेष पथक तडकाफडकी विमानाने रायपूरला पोहचले. त्यानंतर दुर्ग आरपीएफच्या ताब्यातून त्याला उशिरा रात्री ताब्यात घेऊन हे पथक मुंबईला पोहचले. त्यानंतरच्या काही तासातच दुसरा घटनाक्रम घडला. ज्या गुन्ह्यात संशयीत म्हणून आकाशची चाैकशी सुरू होती, त्यातील खरा गुन्हेगार पोलिसांनी जेरबंद केला. नंतर मात्र संशयीत आकाश 'दयेचा पात्र' ठरला.
गुन्ह्याची जाण, मात्र...आकाशला 'त्याने' केलेल्या गुन्ह्याची जाण होती. त्यामुळे दुर्ग आरपीएफच्या ताब्यात असताना त्याने कान पकडून पुन्हा असे करणार नाही, वगैरे सांगितले. केलेल्या गुन्ह्याची 'शिक्षा म्हणून दंड' भरण्याचीही त्याची मानसिकता होती. मात्र, थेट मुंबई पोलिसांनीच येऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो हादरला. आपण केलेला गुन्हा एवढा गंभीर कधीपासून झाला, हेच त्याला कळेना.
काय होता गुन्हाआरपीएफच्या सूत्रांनुसार, आकाश कुलाबा, मुंबई भागात राहतो. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याची आजी बिलासपूर (छत्तीसगड) मध्ये राहते. तिला भेटण्यासाठी तो शनिवारी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने नागपूर मार्गे बिलासपूरला जाणार होता. मात्र, रेल्वेतून प्रवास करताना त्याने तिकिटच काढले नव्हते. अर्थात तो विनातिकिट (डब्ल्यूटी) प्रवास करीत होता. दुर्ग आरपीएफने ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला 'विनातिकिट प्रवासाच्या आरोपात पकडले असावे', असा आकाशचा समज झाला.
प्रश्नांची सरबत्ती अन् कानशेकणीही
विनातिकिटचा गुन्हा सोडून पोलीस भलत्याच गुन्ह्याच्या संबंधाने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती होत होती. तो वारंवार अनभिज्ञता दर्शवित असल्याने त्याची 'कानशेकणीही' झाली. अखेर सैफ हल्ला प्रकरणातील खरा गुन्हेगार पकडला गेला अन् पोलिसांसकट आकाशनेही सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही त्याला ताब्यात घेतले होते, असे आरपीएफ दुर्गचे पोलीस निरीक्षक एस. के. सिन्हा यांनी 'लोकमत'ला सांगितले.