वन विभागात सर्वेअरच्या बदल्यांचा घोळ
By Admin | Updated: June 6, 2014 00:49 IST2014-06-06T00:49:49+5:302014-06-06T00:49:49+5:30
सध्या नागपूर वन विभागात सर्वेअरच्या बदल्यांमधील घोळ चांगलाच गाजत आहे. यासंबंधी काही जणांनी थेट अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) कार्यालयापर्यंत धाव घेऊन लेखी तक्रार केली आहे.

वन विभागात सर्वेअरच्या बदल्यांचा घोळ
नागपूर : सध्या नागपूर वन विभागात सर्वेअरच्या बदल्यांमधील घोळ चांगलाच गाजत आहे. यासंबंधी काही जणांनी थेट अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन-दुय्यम संवर्ग) कार्यालयापर्यंत धाव घेऊन लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी. के. महाजन यांनी नुकत्याच चार दिवसांपूर्वी ६३ वनरक्षक, ७ लिपिक व ४ सर्वेअर कर्मचार्यांचे बदली आदेश जारी केले आहे. मात्र त्या आदेशासोबतच वन विभागात वेगळेच वादळ उठले आहे.
वरिष्ठांकडे करण्यात आलेल्या तक्रारीत उपवनसंरक्षक महाजन यांनी नियमबाह्य बदल्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माहिती सूत्रानुसार, राज्य शासनाने उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकार्यांना वर्ग ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचार्यांच्या विभागांतर्गत बदल्यांचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महाजन यांनी या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. परंतु वन विभागातील सर्वेअर हा वर्ग ‘क’ मध्ये मोडत असला, तरी आजपर्यंत त्यांच्या बदल्या मात्र मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) यांनीच केल्या आहेत. त्यामागे तसे तांत्रिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर वन विभागात एकूण ११ सर्वेअर कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक जण बदलीस पात्र असताना, त्यांना डावलून केवळ चारच लोकांच्या बदल्या का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपवनसंरक्षक महाजन यांनी जारी केलेल्या बदली आदेशानुसार कार्य आयोजना विभागातील विनोद गुरव यांची बाजूच्याच विभागीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. तसेच विभागीय कार्यालयातील एच. आर. नासरे यांना कार्य आयोजना विभागात, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयातील जे. एम. घोडाम यांना सामाजिक वनीकरण विभागात व सामाजिक वनीकरण विभागातील आर. व्ही. कुर्हाटकर यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयात पाठविण्यात आले आहे. परंतु त्याच वेळी सुनील देशमुख गत आठ वर्षांपासून कार्य आयोजना विभागात कार्यरत असून, एस. पी. ढोणे गत पाच वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागात, पी. एम. चव्हाण गत चार वर्षांपासून गोंदिया येथील सामाजिक वनीकरण विभागात, एच. बी. लोखंडे गत चार वर्षांपासून भंडारा येथील सामाजिक वनीकरण विभागात, एस. व्ही. राऊळकर गत आठ वर्षांपासून भंडारा वन विभागात व अमय वागदे चार वर्षांपासून वर्धा येथील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत आहेत. मग असे असताना, वरिष्ठ वन अधिकार्यांची केवळ चारच लोकांवर कृपादृष्टी का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)