एक्स-रे रिपोर्टनंतर वाघाच्या पायावर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:22+5:302021-04-19T04:07:22+5:30
नागपूर : पायाला दुखापत झाल्याने लंगडत चालणाऱ्या वाघाला रेस्क्यू करून आणल्यावर त्याच्या पायाचे एक्स-रे घेण्यात आले आहेत. वाघाचे ...

एक्स-रे रिपोर्टनंतर वाघाच्या पायावर शस्त्रक्रिया
नागपूर : पायाला दुखापत झाल्याने लंगडत चालणाऱ्या वाघाला रेस्क्यू करून आणल्यावर त्याच्या पायाचे एक्स-रे घेण्यात आले आहेत. वाघाचे रक्तनमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. एक्स-रे अहवाल आल्यावर आणि रक्तनमुने निर्दोष आढळल्यावर या वाघाच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शनिवारी सायंकाळी देवलापार (ता. रामटेक) वनपरिक्षेत्र अंतर्गत छवारी बीटमध्ये या वाघाला गुंगीचे औषध देऊन पकडण्यात आले होते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गापासून दीड किमी अंतरावर असलेल्या जंगलात शनिवारी सकाळी भुरालटेक-छवारी मार्गालगत एक वाघ लंगडत चालत असल्याचे आढळले होते. त्यानंतर सायंकाळी देवलापार वनपरिक्षेत्र अंतर्गत छवारी बीटमधील कम्पार्टमेंट क्रमांक-४८४ मध्ये वाघाला गुंगीचे इंजेक्शन देऊन नागपूरला पेंच प्रकल्पातील उपचार केंद्रात आणण्यात आले होते.
गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक प्रमोद पंचभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाघ तीन ते चार वर्षे वयाचा व पूर्ण वाढ झालेला आहे. समोरील डाव्या पायाला असलेली दुखापत फ्रॅक्चरमुळे असावी, असा अंदाज डॉक्टरांच्या पथकाने व्यक्त केला आहे. सोमवारी रक्तनमुन्यांचा व एक्स-रे अहवाल आल्यावर एक ते दोन दिवसांनी वैद्यकीय तपासणीनंतर पायावर शस्त्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.