कल्चरल मार्क्सवादासारखी गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन घातक - सरसंघचालक
By योगेश पांडे | Updated: September 5, 2023 20:32 IST2023-09-05T20:32:31+5:302023-09-05T20:32:47+5:30
मागील काही काळापासून भौतिक सुखाकडे मर्यादेच्या बाहेर ओढा वाढला आहे.

कल्चरल मार्क्सवादासारखी गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन घातक - सरसंघचालक
नागपूर: मागील काही काळापासून भौतिक सुखाकडे मर्यादेच्या बाहेर ओढा वाढला आहे. त्यापुढे बाकी सर्वच गौण असल्याचा प्रचार करून त्याला तत्वज्ञानाचा मुलामा देऊन हेच बरोबर आहे असा दावा समाजातील काही स्वार्थी मंडळी करतात. त्याला कल्चरल मार्क्सवाद वगैरे गोंडस नावे देऊन दुराचाराचे समर्थन केले जाते. ही बाब समाजाच्या दृष्टीने घातक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भातर्फे आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.
कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.देशपांडे व सचिव ॲड.अविनाश तेलंग उपस्थित होते. नकारात्मक तत्वज्ञान समाजावर थोपविण्याचा प्रयत्न जाणुनबुजून काही लोकांकडून करण्यात येतो. दुराचार, अराजकता समाजात वाढले की अशा मंडळींना समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करता येते. निरनिराळे तत्वज्ञान यांचा हवाला देत मनुष्यमधील सकारात्मक व चांगले गुण उद्ध्वस्त करण्यावर त्यांचा भर असतो. अशा प्रयत्नांमुळेच अनेक देशांमध्ये कुटुंबसंस्था उध्वस्त होत आहे. आपल्या देशाची मूल्ये अद्यापही कायम आहे. परंतु देशाची संस्कृती उलथवून टाकण्यासाठी आजवर अनेक अस्मानी, सुल्तानी प्रयत्न झाले, असे सरसंघचालक म्हणाले.
ज्येष्ठ शब्दाला असहायतेचा भाव का चिकटला आहे हे कोडेच आहे. ज्येष्ठांचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात अढळ आहे. म्हातारे शब्दाचा मुळ शब्द महत्त्व हा आहे. मात्र त्याला परावलंबित्वाची झालर उगाचच चिकटली असते. आपल्या परंपरेत ज्येष्ठांच्या पराक्रमाची उदाहरणे आहेत. ज्येष्ठांच्या अनुभवाच्या आधाराने नवीन पिढी आयुष्यातील संघर्षाचा सामना करते. आपली संस्कृती व आयुष्याची सार्थकता ज्येष्ठांकडूनच पुढील पिढीकडे जाते. पुढील पिढीकडे शाश्वत विचार गेले पाहिजे. केवळ जनुकेच नव्हे तर माणुसपणाने जगण्याची कलादेखील ट्रान्सफर करण्याचे काम ज्येष्ठ मंडळी करतात, असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी ८० वर्षांहून अधिक वय झालेल्या शिक्षकांचा सत्कारदेखील करण्यात आला.
सेवानिवृत्त नव्हे सेवाप्रवृत्त व्हा
यावेळी सेवानिवृत्त मंडळींबाबत सरसंघचालकांनी भाष्य केले. सेवानिवृत्त नाही तर सेवाप्रवृत्त झालो असे ज्येष्ठांनी म्हटले पाहिजे. लोकांना भेटणे, पुस्तके देणे, त्यांना घरी बोलविणे, त्यांच्या घरी जाणे या माध्यमातून संस्कृती व आपुलकीचा प्रसार झाला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.