एसटी महामंडळाला बालभारतीच्या साहित्य पुरवठ्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 21:29 IST2021-04-29T21:27:59+5:302021-04-29T21:29:35+5:30
Balbharati literature to ST Corporation लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न खालावले आहे. त्यामुळे या काळात आर्थिक उत्पन्नाचा आधार देण्यासाठी मालवाहतुकीच्या कामाला सध्या प्राधान्य दिले जात आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने बालभारतीच्या साहित्य पुरवठ्याचा आधार या दिवसात शोधला आहे.

एसटी महामंडळाला बालभारतीच्या साहित्य पुरवठ्याचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न खालावले आहे. त्यामुळे या काळात आर्थिक उत्पन्नाचा आधार देण्यासाठी मालवाहतुकीच्या कामाला सध्या प्राधान्य दिले जात आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने बालभारतीच्या साहित्य पुरवठ्याचा आधार या दिवसात शोधला आहे.
अमरावती आणि नागपूर बोर्डाच्या बालभारती साहित्य पुरवठ्याचे काम नागपूर विभागाला मिळाले आहे. दोन वर्षांचे हे कंत्राट मिळाले असल्याने आर्थिक पाठबळ लाभले आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालयांची २५ टक्के मालवाहतूक एसटीसाठी आरक्षित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आता पुरवठा विभागातील धान्य वाहतूक, शिक्षण विभाग, वन विभाग, वेअर हाऊस, एफडीसीएम आदी विभागांसोबत महामंडळातील अधिकाऱ्यांच्या मालवाहतुकीसाठी चर्चा सुरू आहेत. यासोबतच, खासगी व्यापाऱ्यांशीही संपर्क साधून मालवाहतुकीचे काम मिळविले जात आहे.
महामंडळाने वाहतुकीचे दरही कमी ठेवले आहेत. प्रति किलोमीटर ४२ ते ४४ रुपये असा दर असून खासगी वाहतूकदारांकडून तो ५६ ते ६० रुपये आकारला जातो. महामंडळाची ही वाहने क्लोज कंटेनर असल्याने वाहतुकीला मर्यादा आहेत. फक्त १० टन माल नेता येतो. एसटी यापूर्वी मालवाहतूक करत नसल्याने या कामाचा अनुभव नाही. कंत्राटाच्या स्पर्धेत टिकण्याची शक्यता नसल्याने शासकीय कार्यालयांच्या मालवाहतुकीत महामंडळासाठी २५ टक्के आरक्षणाचा निर्णय कामाचा ठरला आहे.
स्वतंत्र कक्ष स्थापन
यासाठी आगारामध्ये स्वतंत्र मालवाहतूक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागपूर विभागाकडे २३ मालवाहू ट्रक आहेत. त्यातील ५ ते ८ वाहने रोज मालवाहतुकीसाठी जात असतात. ८ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या एसटी बसेसची आसने काढून व मागील बाजूला गेट बनवून अगदी कमी खर्चात कंटेनर तयार करण्यात आले आहेत. प्रवासात चालकासोबत एक यांत्रिकी सहायक असतो. लांबचा प्रवास असल्यास दोन चालक आणि एक यांत्रिकी सहायक असतो.
एकही ट्रक रिकामा राहणार नाही, याची दक्षता घेऊ. तीन महिन्यांपासून स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष महाराष्ट्राच्या नियंत्रण कक्षासोबत ऑनलाईन जुळलेला आहे. ट्रकांचा रोजचा प्रवास, अंतर त्यात दिसते. वाहतुकीचे उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांसोबत संपर्क साधून मसाले, विटा, धान्य, किराणा, स्टेशनरी आदींची वाहतूक करण्यासाठी संपर्क सुरू आहे.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर