लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसारामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव ऑक्सिजनचा वापर होत असल्याने खासगी व सरकारी रुग्णालयात याचा तुटवडा भासत आहे. रुग्णालयात अबाधित ऑक्सिजनचा पुरवठा निरंतर सुरू राहावा यासाठी ऑक्सिजन उत्पादक घटकांना त्यांच्या जास्तीत जास्त उत्पादन क्षमतेनुसार उत्पादन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे बुटीबोरी येथील इनॉक्स एअर प्रॉड्क्शन प्रा. लि., एमआयडीसी यांना त्यांच्याकडे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचा १०० टक्के पुरवठा हा केवळ वैद्यकीय उपयोगासाठी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहे.
शनिवारी यासंदर्भात वरिष्ठ स्तरीय बैठकीमध्ये पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा संदर्भातील आढावा घेतला होता. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असून, तो सुरळीत रहावा यासाठी मंत्रालयस्तरावर त्यांनी बोलणी केली असून, गुजरात व मध्य प्रदेश येथून येणाऱ्या पुरवठ्यामध्ये नियमितता राहावी व सुलभता राहावी यासाठी निर्देश देण्यात आले आहे. स्थानिक सर्व ऑक्सिजन पुरवठादार यांच्याशी जिल्हा प्रशासन सध्या संपर्कात आहे.
---------------