‘एक सुरों का काँरवा’ रंगलेली सुरेल सायंकाळ
By Admin | Updated: June 22, 2014 01:04 IST2014-06-22T01:04:35+5:302014-06-22T01:04:35+5:30
aशास्त्रीय संगीतातील सुमधुर राग-रागिण्यांचा परिचय सर्वसामान्य रसिकांना करून देणाऱ्या ‘एक सुरों का काँरवा...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संगीत कला अकादमीतर्फे आज करण्यात आले.

‘एक सुरों का काँरवा’ रंगलेली सुरेल सायंकाळ
संगीत कला अकादमी : शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गीतांचे सादरीकरण
नागपूर : शास्त्रीय संगीतातील सुमधुर राग-रागिण्यांचा परिचय सर्वसामान्य रसिकांना करून देणाऱ्या ‘एक सुरों का काँरवा...’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संगीत कला अकादमीतर्फे आज करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला. कार्यक्रमात राग भैरव ते भैरवीवर आधारित अमिट सिनेगीतांचे सादरीकरण तयारीने करण्यात आले. या कार्यक्रमाने नागपूरकर दर्दी रसिकांची एक सायंकाळ सुरेल झाली.
शास्त्रीय संगीतातील प्रत्येक राग सादरीकरण हे रागसमय चक्रानुसारच करण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्या क्रमानुसार गायकाकडून सादर होणाऱ्या शब्दस्वरांचा हा श्रवणीय काँरवा होता. शास्त्रीय गायक विनोद वखरे यांचे संगीत संयोजनात या कार्यक्रमाची संकल्पना यशश्री भावे - पाठक यांची होती. विनोद वखरे, यशश्री भावे - पाठक, मंजिरी वैद्य, शशी वैद्य या गायकांनी यावेळी गीते सादर केली. पहाटेच्या शितल वातावरणाला अनुरुप अशा राग भैरवमधील ‘जागो मोहन प्यारे...’ हे गीत यशश्रीने सुस्वरात सादर करुन रसिकांची दाद घेतली. विनोद वखरे आपल्या शास्त्रीय गायकीसाठी रसिकांमध्ये प्रिय आहेत. त्यांनी राग अहिर भैरवमधील ‘पुछो ना कैसे मेने रैन बितायी...’ हे गीत भावपूर्णतेने सादर केले. मंजिरीने राग बिलावलमधील ‘पिया तोसे नैना लागे रे...’ हे गीत तयारीने सादर केले. गुणी गायक शशीने राग गोरखकल्याणमधील ‘सुरमयी शाम...’ हे गीत हळुवारपणे सादर करून ही सायंकाळ स्वरांच्या अभिषेकाने चिंब केली. विनय शुक्ला हे अतिथी गायक होते. यानंतर ‘नैनो मे बदरा छाये..., मधुबन मे राधिका नाचे रे..., साथी रे भूल ना जाना मेरा..., दिल के झरोको मे तुझको छुपाकर.., ’ आदी मारवा, हमीर, कलावती, केदार, शिवरंजनी, यमन रागातील गीते सादर करण्यात आली. रागदारीच्या संगीताने या कार्यक्रमात रंगत वाढविली. नासिरभाई यांचे निवेदन होते. गायकांना गोविंद गडीकर, महेंद्र ढोले, श्याम ओझा, सुभाष वानखेडे, तुषार विघ्ने, प्रसन्न वानखेडे, अशोक टाकलवार यांनी सहसंगत केली. कार्यक्रमाला किशोर वानखेडे, नीलिमा बावने, विश्वास चकमलवार, अरविंद कोमावार, अतुल यमसनवार, विनय शुक्ला, हरि मुजुमदार, प्रकाश एदलाबादकर, नंदू अंधारे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)