सुमित ठाकूरच्या बांधल्या मुसक्या
By Admin | Updated: October 10, 2015 03:06 IST2015-10-10T03:06:44+5:302015-10-10T03:06:44+5:30
गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांशी लपवाछपवी करीत फिरणारा कुख्यात गुंड सुमित राजकुमार ...

सुमित ठाकूरच्या बांधल्या मुसक्या
धामणगावात होता दडून : दोन साथीदारही जेरबंद
नागपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांशी लपवाछपवी करीत फिरणारा कुख्यात गुंड सुमित राजकुमार ठाकूर (वय ३०, रा. गिट्टीखदान) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील मीरा छांगाणी नगरात सुमित आपल्या साथीदारासह दडून बसला होता. गुरुवारी पहाटे त्याच्या दोन साथीदारांसह त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला नागपुरात आणल्यानंतर त्याच्या अटक नाट्याची माहिती गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी पत्रकारांना दिली.
प्रेरणानगरातील सुमितच्या घराजवळ प्रा. मल्हारी म्हस्के राहतात. २२ सप्टेंबरला क्षुल्लक कारणावरून सुमित, त्याचा भाऊ अमित आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी म्हस्केंना मारहाण केली.
त्यांनी पोलिसांकडे तक्रार करू नये म्हणून त्यांच्यावर प्रचंड दडपण आणण्यात आले. घटनेच्या तीन दिवसानंतर पुन्हा सुमितच्या गुंडाने म्हस्के यांची कार जाळली. कुख्यात सुमित भाजपाचा पदाधिकारी असल्यामुळे या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली. राजकीय आरोपांच्या फैरीही झडल्या. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दडपण आले.
या पार्श्वभूमीवर, गुन्हेशाखेची पथकं सुमित आणि त्याच्या गुंड साथीदारांचा ठिकठिकाणी शोध घेत होती. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी सुमितचा भाऊ अमित आणि नीलेश उईके या दोघांना शिर्डीत ताब्यात घेऊन गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली केले. मात्र, सुमित हाती लागत नव्हता. तो धामणगावातील गुंडवृत्तीचा आरोपी अतुल रुपराव शिरभाते (वय ३४) याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि उपायुक्त दीपाली मासिरकर, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय रवींद्र पाटील, गिरीश ताथोड, एपीआय नरेंद्र पवार, गोकुळ सूर्यवंशी, दिनेश दहातोंडे, सचिन लुले, हवालदार राजेश ठाकूर, प्रशांत देशमुख, दयाशंकर बिसांद्रे, मंजित ठाकूर आणि राकेश यादव यांनी आज पहाटे ४ वाजता धामणगावचे छांगाणीनगर गाठले. स्वामी समर्थ मंदिराजवळ राहाणाऱ्या शिरभातेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची ‘चौकशी‘ केल्यानंतर त्याने सुमित बाजूच्या घरातील एका खोलीत झोपून असल्याचे शिरभातेने सांगितले.(प्रतिनिधी)
शिरभातेनेच उठवले
सुमित हल्ला करू शकतो, हे माहीत असल्यामुळे त्याला उठवण्यासाठी पोलिसांनी शिरभातेलाच समोर केले. शिरभातेनेच आवाज दिल्यामुळे सुमितने दार उघडले आणि त्याचक्षणी पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच्यासह मनोज प्रकाश शिंदे (वय ३०) याच्याही मुसक्या बांधल्यानंतर पोलिसांनी त्यांना आश्रय देण्याच्या आरोपाखाली शिरभातेलाही अटक केली. या तिघांना नागपुरात आणल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलीस त्याचा गावोगावी शोध घेत होते तर, कुख्यात सुमित फरार झाल्यापासून रायपूर, बैतूल, वर्धासह ठिकठिकाणी फिरत होता. तीन दिवसांपूर्वी तो नागपुरातच मुक्कामी होता. येथूनच तो धामणगावला गेला. त्याने जॉन नामक गुंडाकडून कार जाळून घेतल्याचेही उघड झाले. त्याची पोलो कारही पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात काही पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
पोलीस असताना जाळली कार
मनोज शिंदे कुख्यात सुमितचा राईट हॅण्ड मानला जातो. या दोघांनी २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री जॉन वॉल्टरला पकडले. त्याला दारू पाजली. त्यानंतर जीवे मारण्याचा धाक दाखवून प्रा. म्हस्के यांची कार पेटवून देण्यास बाध्य केले. त्यामुळे जॉनने आपल्या दुचाकीतील पेट्रोल काढले. मनोजने त्याला लायटर दिला. कारला आग लावल्यानंतर जॉन पळून गेला होता. त्यालाही अटक करण्यात आल्याचे गिट्टीखदानचे ठाणेदार अवधेश त्रिपाठी यांनी सांगितले.सुमितकडून जीवाला धोका असल्याची तक्रार केल्यामुळे पोलिसांनी प्रा. म्हस्के यांच्या संरक्षणासाठी दोन पोलीस कर्मचारी नेमले होते. ते असताना प्रा. म्हस्के यांची कार जाळण्यात आली, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता त्या दोन पोलिसांपैकी एकाची सुमितसोबत खुन्नस होती. त्याच्या हजेरीत अशी काही घटना घडल्यास त्याला निलंबित केले जाईल, याची सुमितला खात्री होती. त्याचमुळे त्याने हे कृत्य करवून घेतल्याचे डीसीपी मासिरकर यांनी सांगितले. यातून पोलिसांचा बेसावधपणा उघड झाल्याची बाब पत्रकारांनी अधोरेखित केली असता कार बाहेर होती आणि म्हस्केंच्या जीवाला काही होऊ नये म्हणून पोलीस आतमध्ये तैनात होते, असा खुलासा अतिरिक्त आयुक्त तरवडे यांनी केला.