सुमंत देवपुजारी मुख्य सरकारी वकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:16 IST2017-09-26T00:16:21+5:302017-09-26T00:16:40+5:30
अॅड. सुमंत देवपुजारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुमंत देवपुजारी मुख्य सरकारी वकील
xलोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅड. सुमंत देवपुजारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुख्य सरकारी वकील व सरकारी अभियोक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यांची नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी झाली आहे. त्यांनी सोमवारी सहकारी सरकारी वकील व मित्रांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
१९८५ मधील विधी पदवीधर असलेले देवपुजारी यांनी त्यांचे काका अॅड. प्रभाकर देवपुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती. काकांकडून वकिलीचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर ते स्वतंत्र झाले.
यापूर्वी त्यांनी १९९७ ते २००८ पर्यंत सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना या कार्यालयात कार्य करण्याचा चांगला अनुभव आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मिहान इंडिया, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, विविध राष्ट्रियीकृत बँका, शैक्षणिक संस्था आदींसाठी अनेक प्रकरणांत बाजू मांडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे वकिली करीत असताना देवपुजारी यांनी त्यांच्यासोबत काही प्रकरणांत सहायक म्हणून काम पाहिले आहे. तसेच, ते लवाद व मध्यस्थांच्या पॅनलमध्येही होते. त्यांचे आजोबा वकील होते. त्यानंतर त्यांच्या काकांनी ही परंपरा पुढे चालवली. त्यांचे वडील यशवंत देवपुजारी हे महालेखाकार कार्यालयात अधिकारी होते.