वडिलांना लिव्हर देण्यासाठी आलेल्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST2020-12-09T04:08:22+5:302020-12-09T04:08:22+5:30

मृत तरुण मध्य प्रदेशातील रहिवासी - पित्याच्या उपचारासाठी नागपुरात आला होता नागपूर - आजारी पित्याला लिव्हर देण्याची तयारी ...

Suicide of a child who came to give a liver to his father | वडिलांना लिव्हर देण्यासाठी आलेल्या मुलाची आत्महत्या

वडिलांना लिव्हर देण्यासाठी आलेल्या मुलाची आत्महत्या

मृत तरुण मध्य प्रदेशातील रहिवासी - पित्याच्या उपचारासाठी नागपुरात आला होता

नागपूर - आजारी पित्याला लिव्हर देण्याची तयारी दाखविणाऱ्या मध्य प्रदेशातील एका तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. उज्ज्वल प्रदीप जैन (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो खंडवा (मध्य प्रदेश) जवळच्या कन्हेरा, मसहूर येथील रहिवासी होता.

उज्ज्वलचे वडील प्रदीप जैन यांच्या लिव्हरवर नागपुरातील धंतोलीच्या एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. त्यामुळे तो आणि त्याचे नातेवाईक आलटून पालटून येथे देखभाल करण्यासाठी राहत होते. त्यांनी येथे एका हॉटेलमध्ये खोलीही घेतली होती. पित्याच्या वेदना बघून तो अस्वस्थ होता. त्याने पित्याला लिव्हर देण्याचीही तयारी बोलून दाखवली होती. दरम्यान, ३ डिसेंबरला तो आणि त्याची आई वडिलांजवळ असताना किरकोळ कारणावरून मायलेकात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात उज्ज्वल तेथून निघून गेला. दुसरा दिवस उजाडला तरी तो परतला नाही. गावाकडेही तो गेला नसल्याचे कळाल्याने त्याच्या नातेवाईकांनी धंतोली ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून धंतोलीतील पेट्रोल पंपाजवळच्या झुडूपातून तीव्र दुर्गंध येत असल्याने पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी धंतोली पोलिसांना कळविले. हवालदार सतीश सगणे आणि सहकाऱ्यांनी तेथे पाहणी केली असता एका तरुणाचा मृतदेह पडून दिसला. तो मेडिकलमध्ये पोलिसांनी पाठविला. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी मिसिंग कम्प्लेंट तपासल्या. त्यातून उज्ज्वलच्या नातेवाईकांकडे विचारणा करण्यात आली आणि त्याची ओळख पटली.

---

सीसीटीव्हीतून उलगडा

उज्ज्वलच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे शंका निरसन करण्यासाठी पोलिसांनी गेटवेल तसेच बाजूच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याने ३ डिसेंबरच्या रात्री बाजूच्या निर्माणाधीन इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

---

Web Title: Suicide of a child who came to give a liver to his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.