मनीआर्डर घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 23:07 IST2021-05-20T23:05:19+5:302021-05-20T23:07:27+5:30
Suicide of accused in money order scam दहा वर्षांपूर्वी गाजलेल्या मनीऑर्डर घोटाळ्यातील मुख्य आरोपी उमेश वसंतराव बर्वे (वय ३५), याने गळफास लावून आत्महत्या केली.

मनीआर्डर घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा वर्षांपूर्वी गाजलेल्या मनीऑर्डर घोटाळ्यातील मुख्य आरोपी उमेश वसंतराव बर्वे (वय ३५), याने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयुर्वेदिक ले-आउटमध्ये राहणारा उमेश बर्वे याने दहा वर्षांपूर्वी नागपूर, भंडारा जिल्ह्यांतील अनेकांच्या मनीऑर्डर गायब करून खळबळ उडवून दिली होती. तेव्हा हा मनीऑर्डर घोटाळा प्रचंड गाजला होता. पोलिसांनी बर्वेच्या मुसक्या बांधून त्याला कारागृहात टाकले होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही त्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल झाले होते. चार महिन्यांपूर्वी सक्करदऱ्यात त्याने अनेकांना वेगवेगळ्या एजन्सी मिळवून देतो, असे सांगून अनेकांची रक्कम लंपास केली होती. सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली होती. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला. तो एकटाच घरी राहत होता. गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. माहिती मिळताच सक्करदराचे ठाणेदार सत्यवान माने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. चौकशीत त्याने कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट लिहून ठेवल्याचे आढळले नाही. आर्थिक कोंडीमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे. त्याचे भाऊ राजेश वसंतराव बर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.