Sue the owners of the stray animals | मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा

मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे आता शहरातील भीषण समस्या झाली आहे. शहरातील सर्वच भागातील रस्त्यावर या मोकाट जनावरांचा वावर असतो. या गुरांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर चालावे लागते. ही समस्या सोडविण्याबाबत महापालिकेची स्थिती हतबल झाल्यागत आहे. कारवाई म्हणून एखाद्या भागात रस्त्यावरील जनावरे पकडलीही जातात पण नाममात्र दंड लावण्यात येत असल्यामुळे गुरांच्या मालकांना याचे फारसे काही वाटत नाही. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर लगाम लावणे आवश्यक असून दंडाची रक्कम वाढवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे.
सेव्ह स्पीचलेस आर्गनायझेशनच्या स्मिता मिरे यांनी याबाबत महापालिकेला अनेकदा निवेदन सादर करून या समस्येवर उपायही सुचविले आहेत. शहरात सर्वच रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर असतो. यात वस्तीतील रस्ते आणि महामार्गही सुटलेले नाहीत. कोणत्याही मार्गांवर ही गुरे बसलेली आढळतात. रस्त्यांवरील जनावरांमुळे नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो आणि कित्येकदा अपघातही होतात. मात्र महापालिका या विषयाला फार गंभीरपणे घेत नाही. कधी वाहतूक खोळंबली किंवा अपघात झाला तर या मुक्या जनावरांना बेदम मारहाण केली जाते. वास्तविक अपघात झाला की वाहनचालकांविषयी सहानुभूती व्यक्त केली जाते पण जनावरांनाही तेवढीच इजा होत असते. धक्कादायक म्हणजे महिन्याला १५० च्या जवळपास जनावरांचा अपघाती मृत्यू होत असतो. याचे मालकांनाही काही वाटत नाही.
स्मिता मिरे यांनी सांगितले की, मनपा प्रशासनाला अनेकदा जनावर बसत असलेल्या ठिकाणची माहिती दिली. मात्र एवढे जनावर पकडून ठेवायचे कुठे, असा त्यांचा उलट प्रश्न असतो. कधी कारवाई करून जनावर पकडली तरीही ५० किंवा १०० रुपये मालकांवर आकारली जातात. या किरकोळ दंडामुळे गुरांच्या मालकांना फारसा फरक पडत नाही. उलट महापालिकेच्या लोकांना आम्ही १००० रुपये महिना देत असल्याची अरेरावीची भाषा त्यांच्याकडून वापरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुजोर झालेल्या जनावर मालकांना वठणीवर आणण्यास व रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांची समस्या सोडविण्यासाठी गुरांच्या मालकांवर मोठा दंड आकारणे आवश्यक आहे. गुरे रस्त्यावर असण्यासाठी त्यांचे मालक जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. पहिल्यांदा पकडल्यास ५००० रुपये व दुसऱ्यांदा पकडल्यास १०,००० रुपये दंड आकारण्यात यावा.
यानंतरही जनावरे रस्त्यावर भटकली तर संबंधित मालकांवर गुन्हा दाखल करून कारागृहात पाठविण्याचा कायदा करण्यात यावा, अशी मागणी स्मिता मिरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्षमतेपेक्षा अधिक जनावरे
बहुतेक जनावर मालकांकडे चार लोकांच्या राहण्यापुरतेही घर नसते आणि त्यात हे लोक ५० गाई म्हशी पाळतात. केवळ पैसे कमवण्यासाठी त्या गुरांचे हाल करतात. सकाळी दूध काढण्यापुरते घरी आणून त्यानंतर दिवसभर त्यांना रस्त्यावर उकिरडे खायला सोडतात आणि संध्याकाळी दूध काढून परत सोडून दिले जाते. कुणीही आपल्या ऐपतीपलीकडे गुरे पाळू नये, तसेच पाळायचे असल्यास त्यांची पुरेपूर खाण्याची व राहण्याची नीट व्यवस्थाही करावी यावरही नियमांची गरज आहे.
गुरांना टॅगिंग करावी
महापालिकेने गुरांना लाल व पांढरे असे टॅगिंग करावे. यामुळे मालकीची किती व बेवारस किती याची नोंद होईल. याशिवाय दोनपेक्षा जास्त गाई म्हशी पाळायच्या असल्यास शहराबाहेर पाळावेत तसेच मोकळ्या जागेत पाळावेत जेणेकरून त्यांना इतर दिवस खायला चारा उपलब्ध होईल आणि रस्त्यावर जनावरे दिसणार नाहीत. अपघात टळतील. काही शुल्क घेऊन या गुरे मालकांना शहराबाहेर चरायला जागा द्यावी, ज्याचे दरमहा शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात यावे.

Web Title: Sue the owners of the stray animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.