नव्या दमाने जनसेवा करणार - सुधीर मुनगंटीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 13:44 IST2017-12-30T13:35:42+5:302017-12-30T13:44:15+5:30
गळ्यावरील उपचारानंतर तब्बल दीड महिन्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालत आस्थेने विचारपूस केली. या वेळी मुनगंटीवार यांनी ईश्वर, कुटुंबिय व त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानत पुन्हा नव्या दमाने जनसेवा करणार असल्याचे सांगितले.

नव्या दमाने जनसेवा करणार - सुधीर मुनगंटीवार
आॅनलाईन लोकमत
नागपूर : गळ्यावरील उपचारानंतर तब्बल दीड महिन्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालत आस्थेने विचारपूस केली. या वेळी मुनगंटीवार यांनी ईश्वर, कुटुंबिय व त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानत पुन्हा नव्या दमाने जनसेवा करणार असल्याचे सांगितले.
विमानळावर केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी मुनगंटीवार यांना मिठी मारली. या वेळी खा. रामदास तडस, आ. नाना शामकुळे, आ. समीर कुणावार, आ. पंकज भोयर, आ, संजय धोटे, आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह मुनगंटीवार याचे कुटुंबिय, पत्नी सपना मुनगंटीवार, पूजा चकनलवार, ज्योति तोंडुलवार, अमोल चकलनवार, मंजुषा चकलनवार आदी उपस्थित होते. मुनगंटीवार यांचे सहकारी अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांनी विमानतळावर हार-तुरे स्वीकारले नाही. या वेळी मुनगंटीवार म्हणाले, ईश्वराचा आशिर्वाद, कुटुंबियांची भक्कम साथ, लहान-मोठ्यांचा शुभेच्छा यामुळे आपण या व्याधीतून सुखरूप बाहेर आलो. आजवरच्या आयुष्यात आपण लोकसेवेला प्रधान्य दिले. गेली काही दिवस जनतेची कामे करू शकलो नाही. कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ शकलो नाही. याच्या वेदना होत होत्या. आता पुन्हा ईश्वराने नव्या दमाने काम करण्याची संधी दिली आहे. आज सव्वा महिन्यानंतर कार्यकर्त्यांची भेट होत आहे. अनेकजण स्वागतासाठी आले.
शोषीत, पिडीत जनतेची सेवा करायची आहे. जनसामान्यांना जमेल तेवढी मदत करायची आहे. येत्या काळातही जनतेची सेवा करण्याची संधी मिळो, असेही ते म्हणाले.
‘‘मुनगंटीवार हे लोकनेते आहे. त्यांना लोकांसाठी धावून जाणे आवडते. मात्र, गेले काही दिवस ते उपचारात व्यस्त होते. त्यांना शांत पाहून मलाही अस्वस्थ वाटत होते. आज शेकडो कार्यकर्त्यांना भेटून त्यांना आनंद झाला. ईश्वराने त्यांना अशीच जनसेवा करण्याची शक्ती देवो.’’
- सपना मुनगंटीवार,
(पत्नी)