आईच्या दशक्रिया विधीत मुलाचे आकस्मिक निधन; बसला हृदयविकाराचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 22:00 IST2021-10-25T21:59:31+5:302021-10-25T22:00:06+5:30
Nagpur News दहा दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला. तिची दशक्रिया सोमवारी पार पडली. तिथे मुलगा रामेश्वर रामचंद्र बालपांडे (४०) वर्षे याला हृदयविकाराचा धक्का बसला. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या दशक्रिया विधीत मुलाचे आकस्मिक निधन; बसला हृदयविकाराचा धक्का
नागपूर: दहा दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला. तिची दशक्रिया सोमवारी (दि.२५) रामटेक येथे पार पडली. तिथे मुलगा रामेश्वर रामचंद्र बालपांडे (४०) वर्षे याला येथे हृदयविकाराचा धक्का बसला. नातेवाइकांनी लागलीच त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
नरखेडच्या मोठा मारोती देवस्थान परिसरातील अंजनी रामचंद्र बालपांडे यांचा दहा दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यांचे सर्व कुटुंब सोमवारी रामटेक येथे दशक्रिया विधी करण्याकरिता गेले होते. विधी संपल्यानंतर काही वेळानंतर त्यांचा लहान मुलगा रेल्वे प्रवासी मंडळाचे कोषाध्यक्ष रामेश्वर यांच्या छातीत दुखायला लागले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने नागपूर येथे उपचाराकरिता दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले आहेत. रामेश्वर यांच्या पार्थिवावर मंगळवारी नरखेड येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.