राजेश शेगाेकार, वृत्तसंपादक लाेकमत नागपूर नागपूर : मुलींना गुड टच बॅड टच कळावे यासाठी एका शाळेमध्ये माहितीपर चित्रफीत दाखविली जात असताना एक आठव्या वर्गातल्या मुलीला अस्वस्थ वाटायला लागले. यावेळी तिथे असलेल्या समुपदेशक महिलेला काहीतरी विपरीत घडले आहे, अशी शंका आली. तिने त्या मुलीला विश्वासात घेऊन बाेलते केल्यावर तिच्याच एका शिकवणी शिक्षकाने नकाे तिथे केलेले स्पर्श व अत्याचाराची कहाणी समाेर आली. हे येथे अधाेरेखीत करण्याचे कारण म्हणजे सध्या नागपुरात अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या तथाकथित समुपदेशक विजय घायवट याचे प्रकरण समाेर आले आहे. करिअर कौन्सिलिंगच्या नावाखाली हुडकेश्वरमध्ये मनोविकास केंद्र चालवणारा घायवट विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने त्यांच्या केंद्रात ठेवत असे. तिथे त्याने काही विद्यार्थिनींशी जवळीक साधून त्यांचे शोषण केले. पोलिसांना घायवटच्या केंद्रातून क्लिपिंग्ज, छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज सापडले. ज्यामध्ये अनेक विद्यार्थिनींसोबत त्याने असा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील पीडित अनेक महिला अल्पवयीन असतानाच त्यांचेसाेबत हे कृत्य केलेले आहे, ही बाब चिंता वाढविणारी आहे. लैंगिक शाेषण व त्यामधून हाेणाऱ्या ब्लॅकमेलिंगचा हा सगळाच प्रकार धक्कादायक आहे. एका महिलने हिंमत केली व घायवटचा काळा चेहरा समाेर आला.
लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये एक गोष्ट समान असते, अत्याचार झालेली व्यक्ती असे प्रकार स्वतःहून खूप कमी वेळा बोलून दाखवतात. पीडित व्यक्ती या गोष्टीची वाच्यता का करीत नाही? किंवा एखादी व्यक्ती व्यक्त झाली तरी पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास तयार का होत नाही? यामागे असणारी कौटुंबिक व सामाजिक कारणांची यादी मोठी आहे. त्यामुळे केवळ कायद्याचे पाठबळ असून भागत नाही तर पालकांनी मुलामुलींना संभाव्य लैंगिक अत्याचारापासून संरक्षित ठेवण्यासाठी योग्य वयात, योग्य प्रकारे प्रशिक्षित करणे आवश्यक आहे, हेसुद्धा अधाेरेखीत हाेते. पालकांनी अधिक गांभीर्याने आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण त्यांना कळेल अशा भाषेत घरातूनदेखील दिले पाहिजे. अगदी बालपणापासून मुलांना शरीराच्या विशिष्ट भागाची ओळख करून द्यायला हवी. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यातील भेद समजावून सांगायला हवा.
एका क्लिकवर उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडीओज, लैंगिक शिक्षणाचा पूर्ण अभाव, स्पर्धेत टिकण्यासाठी करावी लागणारी धडपड, यातून येणारे नैराश्य अशा चक्रात अडकलेल्या मुलामुलींवर विकृत आघात झाला तर ते बोलणार कुणाशी? अशा लैंगिक छळांच्या घटनांनी त्यांच्या मनावर हाेणारे परिणाम, वागण्या बाेलण्यातील बदल पालकांनी वेळीच टिपला, मुलांना विश्वासात घेत त्यांना बोलते केले तर अत्याचाराचे असे दृष्टचक्र थांबण्यास मदतच हाेईल. आपल्या पाल्यासोबत मनमोकळा संवाद करणे हेच आता पालकांपुढे हे खूप मोठे आव्हान आहे.
घायवटच्या प्रकरणात तर दाेन काळ्या बाजू समाेर आल्या आहेत. एकतर ताेच अशा अत्याचाराच्या प्रकरणात समुपदेशन करायचा अन् दुसरे म्हणजे या सर्व कृत्यांमध्ये त्याच्या पत्नीचाही सहभाग आहे. एक महिला असूनही तिच्या या साथीचा तिलाही धडा मिळेलच, ती आता सहआराेपी आहे, पाेलिस तिचा शाेध घेत आहेत. नागपूर पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना दाखविलेली तत्परता, गांभीर्य व संवेदनशीलता काैतुकास्पद आहे. ज्या पीडित मुली आहेत त्या आता चांगल्या घरातील गृहिणी असतील. त्यामुळे घायवटच्या कृत्याची जाणीव ज्यांना ज्यांना आहे, अशांनी आता तरी समाेर आले पाहिजे. तरच घायवटसारख्या प्रवृत्ती ठेचता येतील.