संघर्षाने भारलेली ‘अहिंसा’ची यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:15 AM2018-05-31T10:15:19+5:302018-05-31T10:15:27+5:30

आयुष्यात कळायला लागले तेव्हापासून तिचा सामना केवळ संघर्षाशीच झाला. आयुष्याच्या सर्वात मोठ्या वळणावर आईवडिलांचे छत्र हरविले होते. मात्र याच संघर्षाने तिला आत्मविश्वासाचे बळ दिले अन् मनातील जिद्दीलाच तिने मायबाप बनविले.

Success Story of Ahinsa Ukay in HSC 2018 | संघर्षाने भारलेली ‘अहिंसा’ची यशोगाथा

संघर्षाने भारलेली ‘अहिंसा’ची यशोगाथा

Next
ठळक मुद्देजिद्द हेच मायबाप, आत्मविश्वास हीच शक्तीपोरक्या मुलीचा प्रेरणादायी प्रवास

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयुष्यात कळायला लागले तेव्हापासून तिचा सामना केवळ संघर्षाशीच झाला. आयुष्याच्या सर्वात मोठ्या वळणावर आईवडिलांचे छत्र हरविले होते. मात्र याच संघर्षाने तिला आत्मविश्वासाचे बळ दिले अन् मनातील जिद्दीलाच तिने मायबाप बनविले. यातूनच दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रदर्शन दाखवत बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून तिने ८९ टक्के गुण मिळवित नेत्रदीपक यश मिळविले. आता समोरील शिक्षणाचा प्रश्न असला तरी तिचे ध्येय निश्चित आहे. याच विश्वासपंखांच्या आधारावर तिला यशोशिखराला पुढील गवसणी घालायची आहे. भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या अहिंसा उके या विद्यार्थिनीची संघर्षाने भरलेली ही कहाणी खरोखर अनेकांसमोर प्रेरणावाट निर्माण करणारी आहे.
जाईबाई चौधरी ज्ञानपीठची विद्यार्थिनी असलेल्या अहिंसा प्रमोद उके हिचे वडील ती पाचवीत असतानाच वारले. तिची आई मनोविकाराने ग्रस्त होती आणि अहिंसा दहावीला असताना आईचे छत्रदेखील डोक्यावरुन हरविले. जन्मदातेच जगातून निघून गेल्यामुळे अहिंसा अक्षरश: सैरभैर झाली होती. मात्र अशा वेळी तिचे मामा सुनील मेश्राम आणि मामी आम्रपाली मेश्राम यांनी तिला आधार दिला. भावनांच्या चक्रव्यूहात अहिंसा अडकली होती. रडूनरडून तिचे अश्रूदेखील आटतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. आपल्यालादेखील मनोविकार जडतो की काय अशी भीतीदेखील तिला वाटत होती. मात्र मनातील भीती आणि संघर्षाचे अश्रू यांनाच तिने स्वत:चे अस्त्र बनविले. मामीच्या प्रोत्साहनातून ती परत उभी राहिली आणि कुठल्याही परिस्थितीत बारावीत चांगले गुण मिळवून स्वत:ला सिद्ध करायचेच हा संकल्प केला. शाळेतूनदेखील तिला मौलिक सहकार्य लाभले. शिकवणी वर्ग वगैरे लावण्याचा प्रश्नच नव्हता. अशा स्थिती वर्गामध्ये शिकविले जाणारे धडे, स्वअभ्यास आणि स्वत: काढलेल्या नोट्स या आधारावर दररोज ६ ते ७ तास अभ्यास करायला तिने सुरुवात केली. तिच्या या कष्टांचे चीज झाले आणि बारावीच्या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवून स्वत:ची इच्छाशक्ती किती बलवान आहे, हे दाखवून दिले.

‘बॅकिंग’मध्ये करिअर करणारच
अहिंसाचा संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. पुढे शिक्षणासाठी तिला अनेक अडचणींना सामोरे जायचे आहे हे माहीत आहे. मात्र मी माझे ध्येय ठरविले आहे. मला काहीही झाले तरी ‘बॅकिंग’मध्ये ‘करिअर’ करायचे आहे. त्यासाठी हवे ते कष्ट उपसायची माझी तयारी आहे, असे मत अहिंसाने व्यक्त केले,.

Web Title: Success Story of Ahinsa Ukay in HSC 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.