जखमी वाघाला पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:40+5:302021-04-18T04:08:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : समाेरच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने लंगडत चालणाऱ्या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टिमला ...

जखमी वाघाला पकडण्यात यश
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : समाेरच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याने लंगडत चालणाऱ्या वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू टिमला यश आले. त्या जखमी वाघाला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले. हे ऑपरेशन शनिवारी (दि. १७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास देवलापार (ता. रामटेक) वनपरिक्षेत्र अंतर्गत छवारी बीटमध्ये करण्यात आली.
वनविभागाचे कर्मचारी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गापासून दीड किमी अंतरावर असलेल्या जंगलात शनिवारी (दि. १७) सकाळी गस्तीवर हाेते. त्यांना सकाळी १० च्या सुमारास भुरालटेक-छवारी मार्गालगत एक वाघ लंगडत चालत असल्याचे आढळूल आले. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची माहिती लगेच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. वनअधिकाऱ्यांनी त्या वाघाला उपचारासाठी पकडण्याची याेजना आखली आणि तातडीने रेस्क्यू टीमला रवाना केले.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू टीम येईपर्यंत त्या वाघावर पाळत ठेवली हाेती. ताे वाघ सायंकाळी देवलापार वनपरिक्षेत्र अंतर्गत छवारी बीटमधील कम्पार्टमेंट क्रमांक-४८४ मध्ये फिरत असल्याचे आढळून आले. रेस्क्यू टीममधील सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करीत त्या वाघाला बंदुकीच्या मदतीने गुंगीचे इंजेक्शन दिले. ताे पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच त्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले आणि नंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले.
त्या वाघाच्या पायाला दुखापत नेमकी कशामुळे झाली, हे कळू शकले नाही. हे ऑपरेशन विभागीय वनअधिकारी डाॅ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनात एसीएफ संदीप गिरी, देवलापारचे वनपरिक्षेत्र अधिकारी सिद्धेश्वर परिहार, पवनी (ता. रामटेक) चे वनपरिक्षेत्र अधिकारी रीतेश भोंगाडे यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.