घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:52+5:302021-02-05T04:56:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद केले जात आहे. सरकारने नागरिकांच्या खिशाला कात्री लावली ...

घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान हळूहळू बंद केले जात आहे. सरकारने नागरिकांच्या खिशाला कात्री लावली असून नागरिकांनाही ही बाब अद्याप समजलेली नाही.
नागपूरमध्ये एप्रिल २०२० ला एका घरगुती गॅस सिलिंडरसाठी ७८९.५० रुपये दिल्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान म्हणून १९९.१० रुपये जमा होत होते. जानेवारी २०२१ मध्ये एका सिलिंडरसाठी ७४६ रुपये द्यावे लागत आहेत. परंतु बँक खात्यात मात्र केवळ ४० रुपये १० पैसे जमा होत आहेत.
साधारणपणे एका ग्राहकाला एका वर्षात अनुदानाच्या १२ सिलिंडरची तरतूद आहे. परंतु अनेक लोक वर्षभरात केवळ सात ते आठ सिलेंडरचाच वापर करतात. उर्वरित चार ते पाच सिलिंडरचा काळाबाजार होतो. नागपुरात एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीत दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. याचे कारण म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत मोठ्या संख्येने गरिबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु नोव्हेंबरमध्ये ही मागणी काहीशी कमी झाली. हिवाळ्यात घरगुती गॅसची मागणी इतर दिवसांच्या तुलनेत अधिक राहते. परंतु घरगुती गॅसचे दर वाढल्याने मागणीत काहीशी कमतरता आली. याचा फायदा काळाबाजार करणाऱ्यांनी उचलला. विशेष म्हणजे छोटे व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचाच वापर करीत आहेत.
बॉक्स
कसे ठरते अनुदान
घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमतीवर अवलंबून असते. कधी १०० रुपये तर कधी पाच रुपयांचे अनुदान दिले जाते. पूर्वी ६१२ रुपयांपेक्षा अधिक किमतीवर ग्राहकांना अधिक अनुदान मिळत होते. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्याने अनुदान कमी झाले.
बॉक्स
महिना दर अनुदान
एप्रिल २०२० ७८९.५० १९९.१०
मे २०२० ५९० ००
जून २०२० ६३७ ३५.१
जुलै २०२० ६४१ ३५.१
ऑगस्ट २०२० ६४४ ३८.१०
सप्टेंबर २०२० ६४६ ४०.१०
ऑक्टोबर २०२० ६४६ ४०.१०
नोव्हेंबर २०२० ६४६ ४०.१०
डिसेंबर २०२० ६९६ ४०.१०
जानेवारी २०२१ ७४६ ४०.१०
...