खोटी बीले सोपविले, कंपनीला १६.८९ लाखांनी गंडविले; सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Updated: December 27, 2023 19:54 IST2023-12-27T19:54:34+5:302023-12-27T19:54:57+5:30
आरोपीने विमानाने प्रवास न करता तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता खोटे बील तयार करून कंपनीच्या रक्कमेचा अपहार केला.

खोटी बीले सोपविले, कंपनीला १६.८९ लाखांनी गंडविले; सेल्समनविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर : कंपनीच्या कामासाठी मुंबई, दिल्ली, नाशिक हैदराबादला जाण्यासाठी विमान प्रवासाची तसेच हॉटेलची खोटी बीले सादर करून १६.८९ लाखांचा अपहार करणाऱ्या सेल्समन विरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभव रविंद्र मुळे (वय ३५, रा. श्रीनगर, नरेंद्रनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या सेल्समनचे नाव आहे. तो एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोडवरील एरोकॉम कुशन प्रा. लि. या कंपनीत सेल्समन म्हणून कार्यरत आहे.
१८ जून २०२२ ते २७ मे २०२३ दरम्यान आरोपी वैभवने कंपनीचा माल विकण्यासाठी हैदराबाद, नाशिक, दिल्ली आणि मुंबईला विमानाने जाण्यासाठी वेगवेगळ्या तारखेत कंपनीकडून अॅडव्हान्सच्या रुपाने १६ लाख ८९ हजार ४०९ रुपये घेतले. परंतु आरोपीने विमानाने प्रवास न करता तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये न थांबता खोटे बील तयार करून कंपनीच्या रक्कमेचा अपहार केला. या प्रकरणी कंपनीचे मालक शिरीष हेमंत गुप्ता (वय ३६, रा. विघ्नेश इंटर्निया, रामदासपेठ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी ४२०, ४०८, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.