‘त्या’ विद्यार्थ्यांची ‘पेट’ची संधी हुकली
By Admin | Updated: September 18, 2015 02:52 IST2015-09-18T02:52:10+5:302015-09-18T02:52:10+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) यंदा ‘रेकॉर्ड’ प्रतिसाद मिळाला आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांची ‘पेट’ची संधी हुकली
नागपूर विद्यापीठ : दिलासा देण्याची मागणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) यंदा ‘रेकॉर्ड’ प्रतिसाद मिळाला आहे. परंतु विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे काही विद्यार्थी ‘पेट’साठी अर्जच करू शकले नाही. विद्यापीठाच्या लेटलतिफीमुळे ‘पेट’ची संधी हुकली असून आम्हाला दिलासा देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
नागपूर विद्यापीठात दरवर्षी ‘पेट’ या ‘आॅनलाईन’ परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदापासून प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठीसोबतच हिंदी भाषेतदेखील राहणार आहे. त्यामुळे हिंदीभाषिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत अर्ज भरले आहेत. ‘पेट’चे स्वरूप पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने, अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांचा याच वर्षी ‘पेट’ देण्याकडे ओढा होता. ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर ही होती.
परंतु विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने ‘डेझर्टेशन’चा समावेश असलेल्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
अशा अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाचे निकालच हाती नसल्याने त्यांना ‘पेट’ देण्याची इच्छा असूनदेखील अर्ज भरता आलेले नाहीत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला निकाल जाहीर होतील अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा होती; परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.(प्रतिनिधी)
आता वर्षभर प्रतीक्षा
ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाहीत, त्यांना ‘पेट’ देण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘पेट’मध्ये संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने निकाल लावून दिलासा द्यावा व परीक्षेचा अर्ज भरण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.