मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 09:35 PM2019-12-24T21:35:00+5:302019-12-24T21:36:07+5:30

संत चोखामेळा वसतिगृहाच्या समोर विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मेसचे जेवण जेवण्यास नकार दिल्याने, अनेक विद्यार्थी उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झाली आहेत.

Students from backward hostel starved for two days | मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी

मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी

Next
ठळक मुद्देमेस कंत्राटदार बदलण्याची मागणी : जेवणात अळ्या, दुधात पाणी, निकृष्ट दर्जाची फळे देत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या निघातात, जेवण निकृष्ट दर्जाचे असते, महिनोन्महिने केळी किंवा एखाद्या वेळी दुसरे फळ मिळाल्यास ते कीड लागलेले असते, दुधात पाणी असते, मांसाहारही नावापुरताच असतो, अशा अनेक तक्रारी करूनही कुणीच लक्ष देत नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, गड्डीगोदाम येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मंगळवारी संत चोखामेळा वसतिगृहाच्या समोर आंदोलनाला बसले. येथील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून मेसचे जेवण जेवण्यास नकार दिल्याने, अनेक विद्यार्थी उपाशीपोटी आंदोलनात सहभागी झाली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, शाखा गड्डीगोदाम येथे दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वसतिगृहाच्या मेसचे कंत्राट आनंद टेंभुर्णे यांना देण्यात आले आहे. सकाळचा नाश्त्यासह दोनवेळच्या भोजनाची जबाबदारी या कंत्राटदाराकडे आहे. एका विद्यार्थ्याकडून कंत्राटदाराला महिन्याकाठी ४,८५० रुपये दिले जातात. परंतु दोन हजार रुपये लायकीचे भोजनही मिळत नसल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, काही दिवसांपूर्वीच भाजीत अळ्या निघाल्या होत्या, त्यापूर्वी वरणात अळी निघाली होती. नियमानुसार भोजनाच्या वेळी मेस कंत्राटदाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे, परंतु कंत्राटदार कधी येत नाही. निकृष्ट आणि दर्जाहीन भोजन दिले जात असतानाही कुणाचेच लक्ष नाही. १५० विद्यार्थी असताना केवळ ४० अंडी दिली जातात. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी १२ लिटर दूध आणले जाते. ते सर्वांना पुरविण्यासाठी त्यात तिप्पट पाणी ओतले जाते. नियमानुसार ऋतुनुसार उपलब्ध फळे देण्याचा नियम आहे, परंतु कंत्राटदार सहा-सहा महिने केवळ केळी देतो. एखादवेळी दुसरे फळ दिल्यास कीड लागलेले किंवा खराब असते. तीन-चार महिन्यांपूर्वी यासंदर्भातील तक्रारी वॉर्डन यांच्याकडे केली. परंतु त्यांनी उपाययोजना केली नाही. गेल्या दोन आठवड्यापासून भोजनाचा दर्जा फारच घसरला. यामुळे विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून मेसमधील जेवण बंद केले आहे. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भातील तक्रारीचे निवेदनही देण्यात आले. परंतु कुणावरच कारवाई होत नसल्याने मंगळवारपासून आंदोलनाचा मार्ग निवडल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. आंदोलनात २० अंध व पाच दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

पाण्याची बिकट समस्या
येथील विद्यार्थ्यांनी सांगितले की, वसतिगृहात एकच ‘वॉटर कूलर’ असून, तोही नादुरुस्त आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महानगरपालिकेच्या नळावर अवलंबून राहावे लागते. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते. ज्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प पडतो, त्या दिवशी बाहेरून पाणी विकत घ्यावे लागते.

प्रवेश रद्द करण्याच्या धमक्या
मेस कंत्राटदार व वॉर्डनविरोधात आंदोलन सुरू केल्याने पुढील वर्षी वसतिगृहात प्रवेश रद्द करण्याच्या धमक्या वॉर्डन देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, वॉर्डन घरी फोन करून तुमचा मुलगा आंदोलन करीत असल्याने त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल, याची माहिती देत आहे.

Web Title: Students from backward hostel starved for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.