एमपीएससीत प्राधिकरण निवडीच्या पर्यायाने विद्यार्थी गाेंधळले! पुन्हा संधी देण्याची मागणी

By निशांत वानखेडे | Published: March 11, 2024 06:40 PM2024-03-11T18:40:46+5:302024-03-11T18:41:06+5:30

संभ्रमामुळे हजाराे विद्यार्थ्यांचे नुकसान हाेण्याची भीती

Students are confused by the option of authority selection in MPSC! | एमपीएससीत प्राधिकरण निवडीच्या पर्यायाने विद्यार्थी गाेंधळले! पुन्हा संधी देण्याची मागणी

एमपीएससीत प्राधिकरण निवडीच्या पर्यायाने विद्यार्थी गाेंधळले! पुन्हा संधी देण्याची मागणी

निशांत वानखेडे, नागपूर: महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने (एमपीएससी) २०२३ ला काढलेल्या गट ‘क’ पदाच्या भरती प्रक्रियेत नव्याने सुरू केलेल्या प्राधिकरण निवडीच्या पर्यायाने विद्यार्थ्यांना गाेंधळात टाकले. २८० प्राधिकरण असताना काही माेजके पर्याय निवडणाऱ्या हजाराे उमेदवारांना भरतीत नुकसान हाेण्याची शक्यता व्यक्त करीत पर्याय निवडण्यासाठी पुन्हा संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

आयाेगामार्फत अराजपत्रित गट क सेवासंयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ मध्ये लिपिक टंकलेखक संवर्गातील ६००० पदाकरीता जाहीरात प्रसिद्ध केली हाेती. परीक्षेचा अर्ज भरतेवेळी पहिल्यांदाच प्राधिकरण निवड प्रक्रियेची साेय उपलब्ध केली हाेती. मात्र विद्यार्थ्यांना प्राधिकरण निवडीची पूर्व कल्पना किंवा माहिती नसल्याने त्यांच्यात गाेंधळ निर्माण झाला. संबंधित संवर्गात राज्यभरातील २८० प्राधिकरणाची भरती करण्यात येत आहे. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार एक किंवा अनेक किंवा पूर्ण प्राधिकरणाचे पर्याय निवडायचे हाेते. मात्र संभ्रमित उमेदवारांपैकी कुणी एक-दाेन किंवा चार-पाच पसंती पर्याय निवडल्याची माहिती आहे. अनेक उमेदवारांनी पसंती क्रमात जवळच्या शहरांमधील माेजके प्राधिकरणाचे पर्याय निवडले.
ज्या उमेदवारांनी अधिकाधिक किंवा पूर्ण पर्याय निवडले, त्यांच्यासाठी सर्व विभागाच्या संपूर्ण पदाकरीताच्या भरतीत प्राधान्य मिळण्याची संधी आहे. मात्र ज्यांनी केवळ माेजके पर्याय निवडले, त्यांना केवळ त्याच प्राधिकरणात स्थान मिळणार आहे. त्यामुळे निवड न केलेल्या प्राधिकरणातील भरतीत त्यांना संधी मिळणार नसल्याने त्यांची निराशा हाेत आहे. त्यामुळे प्राधिकरण निवडीची संधी पुन्हा देण्यात यावी, अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात आहे. याबाबत आयाेगाची वेबसाईट, एमपीएससीच्या हेल्पलाईनवरही मेल केल्याचे त्यांनी सांगितले.

निकाल लागण्यापूर्वी संधी द्या
आयाेगाने पहिल्यांदाच एवढ्या माेठ्या प्रमाणात भरती राबविली आहे. मात्र प्राधिकरणाच्या पसंतीक्रम निवडीच्या पर्यायाने गाेंधळात टाकले आणि माेठी चुक झाली. सर्व प्राधिकरणाची निवड न केल्याने अशा उमेदवारांना भरतीत कमी संधी मिळणार आहे. यामुळे अनेक वर्षापासून प्रयत्न करणाऱ्या माेठे नुकसान हाेईल. लवकरच मुख्य परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयाेगाने उमेदवारांचा सकारात्मक विचार करून मुख्य निकाल लागण्यापूर्वी प्राधिकरण निवडीची लिंक ओपन करून पुन्हा निवड करण्याची संधी द्यावी, अशी मागणी काही परीक्षार्थिंनी लाेकमतशी बाेलताना केली आहे.

Web Title: Students are confused by the option of authority selection in MPSC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.