शौचालय वापराच्या जनजागृतीत आता विद्यार्थ्यांचाही सहभाग
By Admin | Updated: June 4, 2017 17:26 IST2017-06-04T17:26:47+5:302017-06-04T17:26:47+5:30
हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे.

शौचालय वापराच्या जनजागृतीत आता विद्यार्थ्यांचाही सहभाग
दिगांबर जवादे ।
गडचिरोली : हागणदारीमुक्तीसाठी ग्राम पंचायतींमार्फत गठित केलेल्या गुड मॉर्निंग पथकात जिल्हा परिषद शाळेतील सातवी व आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्याचा अभिनव उपक्रम गडचिरोली जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. याची अंमलबजावणी शाळेच्या पहिल्या दिवसापासून करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने नियोजन सुरू केले आहे.
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करायची असेल तर गावे हागणदारीमुक्त होणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय बांधकामासाठी १२ हजार रूपये व शहरी भागातील नागरिकांना १७ हजार रूपये अनुदान दिले जात आहे. अनेकांनी शौचालये बांधली आहेत, मात्र या शौचालयांचा वापरच केला जात नसल्याचे सत्य पुढे आले आहे. ग्रामीण भागातील ९५ टक्के नागरिकांकडे शौचालय आहे. तरीही गावातील नागरिक शौचास बाहेर जात असल्याचे चित्र आहे.
शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर करण्याविषयी आजपर्यंत शासनाने कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आलेला नाही. स्वच्छतेच्या या अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविल्यास कदाचित सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा सल्ला काही तज्ज्ञांनी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांना दिला. या उपक्रमाला प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एम. एन. चलाख हिरवी झेंडी दाखविली. त्यानुसार पुढील शैक्षणिक सत्रापासून हागणदारी मुक्तीच्या जनजागृतीविषयक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
गावात जे गुड मॉर्निंग पथक तयार केले जाणार आहे, त्या पथकामध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. या कामासाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, युवक, स्वयंसेवी संस्था यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
पुढील आठ दिवसांत पटनोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. पटनोंदणी पंधारवडादरम्यानच प्रभातफेरी काढून शौचालय वापराची जनजागृती केली जाणार आहे. शौचालय वापराचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहेत. त्यानंतर सदर विद्यार्थी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शौचालय वापराचे महत्त्व पटवून देणार आहेत.
गडचिरोली जिल्हा परिषद व शिक्षण विभागाने राबविलेला राज्यातील हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून राज्याला व देशाला सदर प्रयोग मार्गदर्शक ठरावा, यासाठी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
विद्यार्थ्यांनी उघड केले वास्तव
विद्यार्थ्याच्या घरातील शौचालयाचा वापर होतो किंवा नाही, हे सत्य विद्यार्थ्यांकडूनच कळावे, यासाठी जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात जिल्हा परिषद शाळेतील प्रतिविद्यार्थी एक याप्रमाणे १० हजार विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड दिले होते. या पोस्टकार्डमध्ये माहिती भरून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. पोस्टकार्डमध्ये लिहिलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. ग्रामीण भागातील कुटुंब शौचालयाचा वापर करीत नाही, शौचालयाच्या इमारतीचा वापर सरपण ठेवण्यासाठी केला जातो, तर काही कुटुंब शौचालयाचा वापर स्नानगृह म्हणून करीत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील हागणदारीमुक्तीचे वास्तव पुढे आले आहे.