नागपुरात अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 00:33 IST2019-10-03T00:31:33+5:302019-10-03T00:33:02+5:30
अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाझरीच्या जैनम वसतिगृहात घडली आहे.

नागपुरात अभ्यासाच्या तणावामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाझरीच्या जैनम वसतिगृहात घडली आहे. पलक विनोद भंडारी (१८) रा. उमरखेड जि. यवतमाळ असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. पलक गोकुळपेठ येथील एका फॅशन डिझायनिंग अकादमीत शिकायला होती. काही दिवसांपूर्वीच ती शिक्षणासाठी नागपुरात आली होती. तीन महिन्यापूर्वी ती जैनम वसतिगृहात राहायला आली होती. तिच्यासोबत तीन विद्यार्थिनी येथे राहत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पलकला ५ ऑक्टोबरपर्यंत कोणते तरी काम सोपविण्यात आले होते. हे काम पूर्ण न झाल्यामुळे ती तणावात होती. तिने आपल्या सोबतच्या विद्यार्थिनींसोबत याबाबत चर्चाही केली होती. तिने सोबतच्या विद्यार्थिनींना आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगितले. त्यामुळे इतर विद्यार्थिनी क्लासला निघून गेल्या. पलक खोलीत एकटीच होती. दरम्यान तिने गळफास घेतला. दुपारी १२.३० वाजता पलकची मैत्रीण खोलीजवळ गेली. तिने आवाज देऊनही पलकने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या संचालकांना माहिती दिली. काच फोडून दरवाजा उघडला असता पलकने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अंबाझरी पोलिसांना सूचना देण्यात आली. पलकचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.