विद्यार्थी ‘नंबर गेम’च्या मोहात

By Admin | Updated: August 11, 2016 02:24 IST2016-08-11T02:24:08+5:302016-08-11T02:24:08+5:30

दुकानदाराला एक रुपया द्यायचा. त्याने ठेवलेल्या चिठ्ठीच्या तक्त्यामधून एक नंबर विद्यार्थ्याने खोडायचा (स्क्रॅच) आणि ...

Student 'number game' in the mouth | विद्यार्थी ‘नंबर गेम’च्या मोहात

विद्यार्थी ‘नंबर गेम’च्या मोहात

बंदीची मागणी : शाळेसमोरील मांडला खेळ
उमरेड : दुकानदाराला एक रुपया द्यायचा. त्याने ठेवलेल्या चिठ्ठीच्या तक्त्यामधून एक नंबर विद्यार्थ्याने खोडायचा (स्क्रॅच) आणि या एक रुपयावर पाच रुपयांपासून ते ५०० रुपयापर्यंतची रक्कम खिशात टाकायची. अशा या ‘नंबर गेम’च्या मोहात शालेय विद्यार्थी अडकले आहेत. या गेमच्या रूपाने उमरेड शहरात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून, काही शाळेसमोरील दुकानातच विद्यार्थ्यांसाठी सर्रासपणे जुगाराचा खेळ मांडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या खेळामध्ये रोज हजारो रुपयांची उलाढाल सुरू असून, यावर तातडीने बंदी आणण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. विद्यार्थ्यांनी अनेकदा पैसे लावल्यानंतर एखादे वेळेसच पैसे जिंकण्याची संधी मिळते. त्यामुळे मुलांचा मोह वाढत जातो. शाळा सुरू होण्यापूर्वी, शाळेच्या मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यानंतर असंख्य विद्यार्थ्यांची गर्दी या गेमजवळ असते. आजच्या घडीला केवळ एक रुपयांची चिठ्ठी मुलांना भविष्यात सट्टापट्टी किंवा जुगाराच्या चक्रव्यूहात अडकवेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे यांच्याकडे अनेकदा पालकांनी तक्रारी केल्या आणि सदर गेमवर बंदी घालण्याची मागणी केली. परंतु, काही दिवसच सदर चिठ्ठीपट्टीचा धंदा बंद ठेवला जातो. नंतर पूर्ववत सुरू केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पोलिसांनी याची चौकशी करून त्यावर बंदी आणण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Student 'number game' in the mouth