बारावीत नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 21:21 IST2023-05-26T20:54:17+5:302023-05-26T21:21:33+5:30
Nagpur News बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे एका १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

बारावीत नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे एका १७ वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचभवन वस्तीत गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. आकांक्षा अर्जुन सोनबरसे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
आकांक्षाचे आई-वडील खासगी काम करतात. गुरुवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल होता. त्यात आकांक्षा तीन विषयांत नापास झाली. त्यामुळे ती तणावात होती. गळफास घेण्यापूर्वी आकांक्षाने मानेवाडा परिसरात राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन करून आपण नापास झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सांगून मोबाइल बंद केला. त्यानंतर पंख्याच्या हूकला साडी बांधून गळफास घेतला.
यावेळी आकांक्षाचे आई-वडील बाहेर होते. आकांक्षाच्या बहिणीने त्वरित भावाला फोन करून घरी पोहोचण्यास सांगितले. तिचा भाऊ घरी पोहोचला असता त्याला आकांक्षा पंख्याला लटकलेली दिसली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने बहिणीला खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून आकांक्षाला मृत घोषित केले. चंद्रभान सोनेकर यांच्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
..........