आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात पार पडली एसटीच्या बँकेची निवडणूक; जिल्ह्यात ८४:७४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2023 20:34 IST2023-06-23T20:34:27+5:302023-06-23T20:34:58+5:30
Nagpur News चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या एसटी महामंडळ को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आज पार पडली. तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणूकीच्या मतदानात मतदारांचा जोरदार उत्साह बघायला मिळाला.

आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात पार पडली एसटीच्या बँकेची निवडणूक; जिल्ह्यात ८४:७४ टक्के मतदान
नागपूर : चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या एसटी महामंडळ को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आज पार पडली. तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणूकीच्या मतदानात मतदारांचा जोरदार उत्साह बघायला मिळाला. नागपूर जिल्ह्यात तब्बल ८४.७४ टक्के मतदारांनी मतदान केले.
चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या बँकेचे १९ जणांचे संचालक मंडळ आहे. त्यात १४ जण सर्वसाधारण गटातून, तर पाच संचालक राखीव गटाचे आहेत. संचालक मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी कोरोनामुळे तसेच विविध कारणांमुळे दोन वर्षे ही निवडणूक लांबली. आता २०१६ नंतर तब्बल सात वर्षांनी ही निवडणूक पार पडली. एकूणच उलाढाल बघता बँकेच्या तिजोरीची अर्थात सत्तेची चावी आपल्याकडे असावी, यासाठी विविध पॅनल्सनी जोर लावला होता. त्यासाठी पाच प्रमुख पॅनलसह एकूण १४३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकले होते.
प्रत्येकाने आपापल्या परीने संपर्क साधून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. अशा स्थितीत ही निवडणूक आज पार पडली. नागपूर शहरातील पाच, हिंगणा वर्कशॉप एक आणि उमरेड, काटोल, रामटेक तसेच सावनेर प्रत्येकी एक अशा एकूण १० केंद्रावर आज मतदान पार पडले. जिल्ह्यात तब्बल ८४.७४ टक्के मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. त्यावरून या निवडणूकीविषयी बँकेच्या मतदारांमध्ये किती उत्साह होता, याची प्रचिती यावी. निवडणूक अधिकारी नितीन काळे तर क्षेत्रीय अधिकारी जयंत पालटकर यांनी आज निवडणूकीच्या मतदानाची प्रक्रिया आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली. मतदानाच्या वेळी कसलीही गडबड, गोंधळ झाला नसल्याचे पालटकर यांनी लोकमतला सांगितले.
---