धडपड वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी!

By Admin | Updated: December 21, 2014 00:15 IST2014-12-21T00:15:21+5:302014-12-21T00:15:21+5:30

सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे भूषविलेली, एकेकाळी लाल दिव्यातून फिरणारी व विकासांच्या कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक महिला आजही चंद्रमोळीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहते.

Struggling to get justice! | धडपड वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी!

धडपड वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी!

लढा अंगणवाडीच्या विकासासाठी : जि.प.च्या माजी अध्यक्षाची संघर्षकथा
सुमेध वाघमारे - नागपूर
सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे भूषविलेली, एकेकाळी लाल दिव्यातून फिरणारी व विकासांच्या कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक महिला आजही चंद्रमोळीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहते. अंगणवाडी सेविका म्हणून तुटपुंज्या वेतनात आपले घर चालविते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटाव्यात एवढीच तिची मागणी आहे.
किसनाबाई भानारकर त्या महिलेचे नाव. भंडारा जिल्ह्यातील, पवनी तहसीलमधील कन्हाळा येथे राहणाऱ्या किसनाबाई शुक्रवारी अंगणवाडीच्या निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करणे, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करणे, बालकांमधले मृत्यू, आजार, कुपोषण कमी करणे आणि यामुळे होणारी शैक्षणिक गळती थांबवणे. आई आणि कुटुंबाचे बालसंगोपनाचे कौशल्य वाढवणे ही उद्दिष्ट ठरवून किसनाबाई काम करीत आहे. त्यांना बोलते केले असता त्या म्हणाला, अंगणवाडी म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. याच आधारावर मला लोकांनी १९९५ मध्ये कन्हाळा गावाचे सरपंच केले. १९९७ मध्ये समाजकल्याण सभापती झाले आणि १९९८ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. यादरम्यान अनेक विकास कामांच्या कोट्यावधींच्या फाईलवर स्वाक्षरी केल्या. लाल दिव्याच्या गाडीतून चंद्रमोळीच्या झोपडीत शिरताना कधीही लाज वाटली नाही. त्यावेळीही चटणी भाकर खात होती आजही खाते. नशिबाने जेवढं भरभरून दिले तेवढंच हिसकावूनही घेतल. १९८६ मध्ये पती गेले. २०१०मध्ये दोन्ही मुले पुरात वाहून गेली. आज मी एकटी असलीतरी अंगणवाडीतील असंख्य मुले माझ्यासोबत आहे. आता तेच माझे कुटुंब आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मी स्वत: अनुभवत आहे. त्या म्हणाल्या, कुपोषण हटवणे ही सोपी गोष्ट नाही. ही लढाई समाजाने अंगणवाडीवर सोपवून समस्या सुटणार नाही. अंगणवाडी केवळ यासाठी मदत करते. अंगणवाडी सेवांमध्येही अनेक अडचणी असल्याने शासनाने त्या सोडवाव्यात एवढीच मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Struggling to get justice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.