वाळू माफियांविरुद्ध दणकेबाज कारवाई
By Admin | Updated: December 7, 2014 00:30 IST2014-12-07T00:30:07+5:302014-12-07T00:30:07+5:30
लोकमतने वाळू माफियांकडून केल्या जाणाऱ्या रेती तस्करीचा भंडाफोड करताच जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी मध्यरात्री वाळू माफियांविरुद्ध पोलिसांच्या मदतीने ‘अॅक्शन प्लॅन’ करून

वाळू माफियांविरुद्ध दणकेबाज कारवाई
एकाच रात्रीत ३० ट्रक पकडले : २ कोटींचा माल जप्त
नागपूर : लोकमतने वाळू माफियांकडून केल्या जाणाऱ्या रेती तस्करीचा भंडाफोड करताच जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी मध्यरात्री वाळू माफियांविरुद्ध पोलिसांच्या मदतीने ‘अॅक्शन प्लॅन’ करून ३० ट्रक पकडले. उपराजधानीला जोडणाऱ्या सात वेगवेगळ्या मार्गावर महसूल अधिकाऱ्यांना नेमून रात्रभर रेती, गिट्टी, मुरुमाची तस्करी करणारे ३० ट्रक पकडले. काही ठिकाणी चालकांसह ट्रकमालकही सापडले. काही ठिकाणी मात्र केवळ चालकच हाती लागले. या सर्वांवर गुन्हे दाखल करून महसूल आणि पोलीस विभागाने रेती, गिट्टी आणि वाहनांसह सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आणि वाहने जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई असून, यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील रेतीघाटावरून रेतीची चोरी करून वाळू माफिया या रेतीची बिनबोभाट तस्करी करतात. एका रात्रीत ३०० ते ४०० ट्रक चोरीची रेती विकून वाळू माफिया दररोज सुमारे ५० लाख रुपयांची कमाई करतात. यातून मोठा हिस्सा पोलीस, आरटीओ आणि महसूल प्रशासनातील काही अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या खिशात जातो. लोकमतने याबाबतचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी वाळू माफियांविरुद्ध ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीनंतर महसूल विभाग आणि पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई केली.
हुडकेश्वरमधील दिघोरी टोल नाक्याजवळ एमएच ४०/ वाय ६३४५ चा आरोपी चालक दिलीप पंचेश्वर आणि मालक नरेंद्र हजारे, एमएच ४०/ वाय ७८८६ चा आरोपी चालक जमीउल्ला खान आणि मालक नजीम युसूफ खान तसेच एमएच ४०/ वाय १५०५ चा आरोपी चालक जयसलाल पंचेश्वर आणि मालक नरेंद्र हजारे यांच्याकडून ३२ हजारांची रेती तसेच एमएच ३१/ सीबी १८७८ चा आरोपी चालक वामन करपती व मालक जितेंद्र गोंडाणे एमएच ३१/ बीक्यू १९९५ चा आरोपी चालक भाऊदास सुखदेव आणि मालक रमेश मेश्राम यांच्याकडून १२,८०० रुपयांची रेती आणि वाहनांसह एकूण ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रवींद्र रघुनाथ भोपे यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी उपरोक्त चालक, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
गिट्टीखदानमध्ये मुरुम, गिट्टी जप्त
आज पहाटे ३ पासून सकाळी ९ पर्यंत नवीन काटोल नाक्याजवळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी ट्रक एमएच ३१/सीबी ९०८५ चा आरोपी चालक सुनील मधुकर वाढई, एमएच ३१/ सीएस ४४९९चा आरोपी चालक राहुल शिवाजी वाघमारे, एमएच ४०/ वाय ४५९९ चा आरोपी चालक नरेश झनकलाल उईके, एमएच ३१/ सीबी ५३८ चा आरोपी चालक प्रवीण प्रल्हाद डकरे, एमएच ४०/ एके ७८१८ चा आरोपी चालक भिक्कुलाल अजाबराव सलामे, एमएच ३१/ ५४७३ चा आरोपी चालक मारोती महादेव कुसराम आणि एमडब्ल्यूवाय ४०२२ चा आरोपी चालक दशरथ अशोक मनोहरे यांच्याकडून २१ हजारांचा मुरुम तसेच गिट्टी आणि वाहने असा ५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आनंदराव गुलाबराव उके यांच्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)
कळमना
कळमन्यात आज पहाटे ५.३० च्या सुमारास पारडी नाक्यावर दोन ट्रक पकडण्यात आले. त्यांच्याकडून गिट्टी आणि रेती तसेच ट्रकसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यातील तुळशीराम साधूराम राऊत आणि धनीराम शंकरराव हत्तीमारे हे दोन ट्रकचालकच पोलिसांच्या हाती लागले. ट्रकमालक आणि रेतीमाफिये मात्र पळून गेले. कळमना पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
प्रतापनगर
प्रतापनगरातील हिंगणा टी पॉर्इंटवर आज पहाटे ४.४५ च्या सुमारास गिट्टी भरलेले दोन ट्रक जप्त करण्यात आले. त्याचे चालक उमेश परमेश्वर गणवीर आणि शिवा मनोहर साबर या दोघांना अटक करून महसूल विभागाने त्यांच्याकडून १५ हजारांची गिट्टी आणि सुमारे १५ लाखांची वाहने जप्त केली. नरेंद्र मधुकर भगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी उपरोक्त आरोपी तसेच वाहनमालकांवर गुन्हे दाखल केले.
कोराडी
कोराडी मार्गावर रेती आणि गिट्टी भरलेले सहा ट्रक जप्त करण्यात आले. चालक वसंत सुखदास उईके, गुरुचरण गुरुराम निर्मलकर, दुर्गेश दीपक राजुरया, केवलराम यश धुर्वे, ओमप्रकाश पुनाराम वाघाडे आणि मुकेश लालाजी तुरकर यांना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. अरविंद रामभाऊ शेटे यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हे दाखल करून उपरोक्त वाहनचालकांना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.