नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देश विदेशातील अनुयायांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता अजनी, नागपूर आणि कामठी रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त लावला जाणार आहे. त्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन चालविले आहे.
दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देश विदेशातील अनुयायांची दीक्षाभूमी तसेच कामठीच्या ड्रॅगन पॅलेस मध्ये गर्दी होते. विचारांचे सोने लुटण्यासाठी येणारे बाबांचे अनुयायी मुख्यत्वे अजनी रेल्वे स्टेशन, नागपूरचे मुख्य रेल्वे स्टेशन तसेच कामठी रेल्वे स्थानकावरून येणे जाणे करतात. ते लक्षात घेऊन या तीनही रेल्वे स्थानकांवर तसेच बाहेरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे. त्यासाठी रेल्वेचे पोलीस (जीआरपी) अधीक्षक मंगेश शिंदे यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) अधिकारी तसेच नागपूर शहर पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधने सुरू केले आहे.
सोमवार पासून बंदोबस्त
सोमवारी २९ सप्टेंबर पासून या तिन्ही रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त लावला जाणार असून जीआरपी तसेच आरपीएफच्या सोबतीला रेल्वे कर्मचारी राहणार आहेत. तीनही रेल्वे स्थानकावर बॉम्बशोधक आणि नाशक पथक देखील तैनात राहतील. गर्दीत कोणती गडबड होऊ नये यासाठी साध्या देशातील पोलिस आणि आरपीएफचे जवानही लक्ष ठेवून राहणार आहेत.
जीआरपी. आरपीएफच्या सुट्या रद्द
रेल्वे स्थानकावर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे पोलीस (जीआरपी) तसेच रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय मुख्यालयातून अतिरिक्त मनुष्यबळ मागवून नमूद रेल्वे स्थानकांवरील पोलीस बंदोबस्तात लावला जाणार आहे.
आज होणार संयुक्त बैठक
या संबंधाने बंदोबस्ताचे नियोजन करण्यासाठी रेल्वे पोलीस अधीक्षक कार्यालयात जीआरपी,आरपीएफ तसेच शहर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुरक्षेच्या संबंधाने काय काय उपाययोजना करायच्या त्यावर मंथन केले जाणार आहे.