नियम तोडल्यास कठोर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST2021-02-18T04:14:43+5:302021-02-18T04:14:43+5:30
वानाडोंगरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या हिंगणा तालुक्यात यापुढे कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसील ...

नियम तोडल्यास कठोर कारवाई होणार
वानाडोंगरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या हिंगणा तालुक्यात यापुढे कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे. तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाकडून पैदल मार्च काढून नियमांचे पालन सक्तीने व्हावे व कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन बुधवारी करण्यात आले.
तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. तीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सजग राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या अनुषंगाने तहसील कार्यालय हिंगणा येथे तहसीलदारांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समितीचे अधिकारी, लोकप्रतिनिधींना बोलावून तालुक्यात सुरक्षात्मक उपायोजना राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या. त्यानंतर तहसील कार्यालय ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते पंचायत समितीपर्यंत पैदल मार्च काढून मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तहसील कार्यालयातील बैठकीला हिंगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सारीन दुर्गे, तहसीलदार संतोष खांडरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण पडवे, नायब तहसीलदार ज्योती भोसले, भारती मेश्रे, नायब तहसीलदार महादेव दराडे व इतर सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
- मागील काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
संतोष खांडरे, तहसीलदार, हिंगणा