नागपूर : पोलीस दलातील एका अधिकाऱ्याचा जातीय द्वेषातून छळ करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना प्रा. कवाडे यांनी म्हटले आहे की, ठाणे येथे कार्यरत असताना पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांचा जातीय द्वेषातून परमबीर सिंग यांनी छळ केला. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना २० महिने कारागृहात राहावे लागले. त्यांची नंतर निर्दोष मुक्तता झाली. घाडगे सध्या अकोल्यात कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीची अलीकडे दखल घेण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल झाला. मात्र, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. एका निर्दोष अधिकाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जातीय द्वेषातून खोट्या गुन्ह्यात अडकवून छळ करणाऱ्या परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी विशद केली. या संबंधाने आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचेही प्रा. कवाडे यांनी म्हटले आहे.
---
सीआयडीकडे दिले पुरावे
घाडगे यांच्या तक्रारीवरून अकोल्यात परमबीर सिंग यांच्यासह ३३ जणांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. गेल्या बुधवारी घाडगे यांचे बयाण सीआयडी अधिकाऱ्यांनी मुंबईत नोंदवून घेतले. यावेळी घाडगे यांनी काही पुरावेही सीआयडीला सोपविल्याचे सांगितले जाते.
---