भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई
By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:46:04+5:302014-12-11T00:46:04+5:30
रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करणारे, खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी

भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई
गिरीश बापट यांचे आश्वासन : अ.भा. ग्राहक पंचायतचे निवेदन
नागपूर : रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करणारे, खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी अ.भा. ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाला दिले.
२९ समस्यांची मंत्र्यांना यादी
रेशन दुकानांमध्ये कार्डावर नागरिकांना मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून चांगल्या दर्जाचे धान्य खुल्या बाजारात विकले जात आहे. खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये होणारी जीवघेणी भेसळ, बाजारात विकले जाणारे रासायनिक दूध नागरिकांच्या जीवास हानी करणारे असल्याची बाब अ.भा. ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. यावर जातीने लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने मंत्र्यांची रविभवन येथे अलीकडेच भेट घेऊन त्यांना २९ समस्यांची यादी दिली. स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करा भेसळ रोखण्यासाठी सर्व प्रकारची तपासणी त्वरित होण्याच्या दृष्टीने सर्व सोयींनी युक्त एक स्वतंत्र प्रयोगशाळा नागपुरात सुरू करण्यात यावी, बाजारात मिळणारे रासायनिक दूध तसेच दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्रात गाई-म्हशींद्वारे शुद्ध दूध मिळण्याचे प्रमाण फार कमी असतानासुद्धा लाखो नागरिकांना दुधाचा मुबलक पुरवठा होतो काय, अशी शंका येत असून यामध्ये रसायनामध्ये दूध बनवून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शंका पंचायतने मंत्र्यांसमोर मांडली. याशिवाय खाद्यपदार्थ, तेलामधील भेसळ, पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.(प्रतिनिधी)
निकालाची प्रत ९० दिवसांत मिळावी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रार करण्यासाठी ३५ अटी लादल्या असून त्या त्वरित रद्द करण्यात याव्या, तक्रारकर्त्यांना न्याय लवकरच मिळावा, नियमाप्रमाणे ९० दिवसात निकालाची प्रत ग्राहकाला मिळावी, अशी मागणी केली. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये अपील करणाऱ्यांना तीन ते चार वर्षे न्यायच मिळत नाही, ही शोकांतिका असून त्वरित न्याय मिळावा, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे, विदर्भ प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या अॅड. गौरी चांद्रायण, शहर सचिव उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अशोक पात्रीकर, संपाद आपटे, प्रसिद्धी प्रमुख गणेश शिरोळे, संपर्क प्रमुख विनोद देशमुख, सतीश शर्मा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.