‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल 

By योगेश पांडे | Updated: April 3, 2025 22:57 IST2025-04-03T22:57:22+5:302025-04-03T22:57:33+5:30

बुधवारी सापडलेल्या तिच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येचे कारण समोर आले असून यातील इतरही दुव्यांचा पोलिस तपास करत आहेत. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Stress after 'breakup', young engineer commits suicide; She took extreme step by sending her father to bring breakfast | ‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल 

‘ब्रेकअप’नंतरचा तणाव, अभियंता तरुणीची आत्महत्या; वडिलांना नाश्ता आणायला पाठवून उचलले टोकाचे पाऊल 

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रियकराशी ब्रेकअप झाल्यानंतर तणावात असलेल्या एका अभियंता तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. वडिलांना सकाळी नाश्ता आणायला पाठवून तिने गळफास घेत जीव दिला. बुधवारी सापडलेल्या तिच्या सुसाईड नोटमधून आत्महत्येचे कारण समोर आले असून यातील इतरही दुव्यांचा पोलिस तपास करत आहेत. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

वैशाली (२८) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. तिच्या घरची स्थिती सामान्य असून वडील कामगार आहेत. वैशालीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते व ती पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरीला होती. काही आठवड्यांअगोदर ती सुटीवर घरी आली आणि तेव्हापासून ती परत गेलीच नाही. आल्यापासूनच ती काहीशी तणावात असल्याप्रमाणे वाटत होती. मात्र कामाचा तणाव असेल असे घरच्यांना वाटले. तिच्या घरी केवळ वडील व भाऊच आहेत. कामानिमित्त तिचा भाऊ बाहेरगावी गेला होता. मंगळवारी सकाळी तिने वडिलांना नाश्ता आणायला बाहेर पाठविले. तिच्या म्हणण्यावर ते घराबाहेर गेले व काही वेळाने नाश्ता घेऊन परत आले. घराचा दरवाजा बंद होता. वैशालीने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने ते मागील दरवाजातून आत गेले. समोरील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. वैशाली गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. त्यांचा आक्रोश ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. तिला इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सुसाईड नोटमध्ये प्रियकराचा उल्लेख
दरम्यान, तिने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने प्रियकरासोबत त्याच्या भावाच्या नावाचादेखील उल्लेख केला आहे. तिने सुसाईड नोटमध्ये एका मैत्रिणीवरदेखील दोषारोप केले आहेत. दरम्यान, काही दिवसाअगोदर इंदोर विमानतळावरून तिचा मोबाइल चोरी गेल्याची माहिती पोलिसांना कळाली असून त्या दिशेनेदेखील तपास सुरू आहे.

Web Title: Stress after 'breakup', young engineer commits suicide; She took extreme step by sending her father to bring breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.