त्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 22:56 IST2020-12-19T22:54:39+5:302020-12-19T22:56:25+5:30
Strangled by a policeman सहकारी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

त्रस्त पोलीस कर्मचाऱ्याने लावला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सहकारी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. हर्षल किशोर लेकुरवाळे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मित्रांना फोन करून आपली कैफियत सांगितली. सुसाईड नोटमध्येही झालेल्या त्रासाचा उल्लेख करून हर्षलने आपली व्यथा मांडली. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली.
पोलीस लाईन टाकळीत राहणारा किशोर मूळचा अमरावती जिल्ह्यातील वरुडचा रहिवासी आहे. त्याला आई-वडील, भाऊ मिलिंद आणि विवाहित बहीण असल्याचे समजते. ते तिकडेच राहतात.
किशोर २०११ मध्ये पोलीस दलात रुजू झाला होता. दीड वर्षापूर्वी त्याला मुख्यालयातून शांतिनगर ठाण्यात नियुक्ती मिळाली होती. पोलीस ठाण्यातील हर्षलला सिनियर असलेला एएसआय, हवालदार आणि नायक त्याला विनाकारण मानसिक त्रास देत होते. यासंबंधाने हर्षलने वरिष्ठांकडे तक्रारही केली होती, मात्र त्याला दाद मिळाली नाही. उलट कुण्या एका कारणामुळे त्याला आर्थिक दंड ठोकला गेल्याने हर्षलला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. यासंबंधाने तो मित्रांकडे नेहमी आपली कैफियत मांडत होता. मित्रांनीही पोलीस ठाण्यात हर्षलला त्रास देणाऱ्यांना समज देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनाच धाकदपट करून हुसकावून लावण्यात आले होते. यामुळे हर्षल कमालीचा हताश झाला होता.
हर्षलची पत्नी ज्योत्स्ना आपल्या दीड वर्षीय चिमुकल्याला घेऊन माहेरी कळमेश्वरला गेली आहे. ती दुपारपासून त्याला फोन करीत होती. सारखा सारखा नो रिस्पॉन्स असल्याने ज्योत्स्नाने हर्षलच्या मित्राला फोन करून क्वॉर्टरवर जाऊन बघायला सांगितले. त्यानुसार दुपारी १ ते २ च्यादरम्यान मित्र त्याच्या पोलीस लाईनमधील क्वॉर्टरवर गेला असता हर्षल गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती पोलीस लाईनमध्ये पोहचताच एकच खळबळ उडाली. अनेक पोलीस, त्यांचे कुटुंबीय आणि गिट्टीखदान ठाण्यासह वरिष्ठांनीही तेथे धाव घेतली.
सुसाईड नोट जप्त
हर्षलच्या घरात सुसाईड नोट सापडली. पोलिसांनी ती नोट जप्त केली. त्यात त्याला त्याच्या सिनियरकडून होणाऱ्या त्रासाचा उल्लेख आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या माहितीला दुजोरा दिला. आत्महत्या करण्याची हर्षलवर वेळ आणणारे दोषी पोलीस कोण त्याची चौकशी केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.