ग्रामीण भागाला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:45+5:302021-06-09T04:10:45+5:30
रामटेक/कोंढाळी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंगळवारी दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला. यात रामटेक नजीकच्या नंदापुरी येथे मोठे नुकसान ...

ग्रामीण भागाला वादळाचा तडाखा
रामटेक/कोंढाळी : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंगळवारी दुपारी वादळी पावसाचा तडाखा बसला. यात रामटेक नजीकच्या नंदापुरी येथे मोठे नुकसान झाले. काटोल तालुक्यात कोंढाळी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. येथे तरोडा गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
रामटेक आणि मौदा तालुक्यात दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. वादळामुळे नंदापुरी गावातील काही घरांवरील टीन पत्रे, कवेलू उडाले. पावसाने घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू व जीवनावश्यक साहित्यही भिजले. हरिहर राइस मिलवरील टीनचे पत्रे उडाली. सूर्यालक्ष्मी कॉटन मिलला मनसर सब स्टेशनवरून करण्यात येणारे १२ ते १५ विजेचे खांब वादळामुळे वाकले. गावातील मुख्य रस्ता व स्मशानभूमीतील ५० वर झाडे कोसळली. धानाच्या बांध्यातही भरपूर प्रमाणात पाणी साचले. रामटेक मौदा रस्त्यावर नंदाई मंदिराजवळील दोन्ही बाजूंची बाभळीची झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक तीन तास ठप्प होती. या वादळाने नंदापुरी गावातील सुरेश नौकरकर, रामेश्वर मेंघरे, हरिचंद मेंघरे, नत्थू मेंघरे, नीलकंठ नौकरकर, सुरेंद्र वगारे, निंबाजी वगारे, बलराम डेकर, शामराव इरपाते, मनोज नौकरकर, दिलीप डहारे, बालचंद दमाहे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. यापूर्वी १० मे रोजी याच गावाला वादळाचा तडाखा बसला होता. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काटोल तालुक्यात कोंढाळी परिसरात दोन तास पाऊस झाला. वादळी पावसामुळे तरोडा गावात अनेक घरांत पाणी शिरले. खापरी (बारोकर) गावात अनेकांच्या घराचे कवेलू उडाले. गावातील झाडे कोसळली. पावसाने कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रानजीकच्या सखोल भागातील घरात पावसाचे पाणी शिरले. कोंढाळीचे नायब तहसीलदार नीलेश कदम यांनी नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षणाचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.