वन विभागात बदल्यांचे ‘वादळ’
By Admin | Updated: August 3, 2015 03:04 IST2015-08-03T03:04:37+5:302015-08-03T03:04:37+5:30
सध्या वन विभागात वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरू न प्रचंड वादळ उठले आहे. राज्य शासनाने नुकत्याच चार दिवसांपूर्वी वन विभागातील १८ वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.

वन विभागात बदल्यांचे ‘वादळ’
कही खुशी कही गम : टी.एस.के. रेड्डी यांनी पदभार सांभाळला
लोकमत विशेष
जीवन रामावत नागपूर
सध्या वन विभागात वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरू न प्रचंड वादळ उठले आहे. राज्य शासनाने नुकत्याच चार दिवसांपूर्वी वन विभागातील १८ वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. यात नागपूरचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) शैलेश टेंभूर्णीकर यांना तडकाफडकी वनभवन येथे मुख्य वनसंरक्षक ( संयुक्त वनव्यवस्थापन, नियोजन व विकास) म्हणून पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जागी गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांची वर्णी लागली आहे. शिवाय टी. एस. के. रेड्डी यांच्या जागी नागपूर येथील वनसंरक्षक (कार्य योजना) पी. कल्याणकुमार यांना पदोन्नतीसह बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही बदल्या सर्वांधिक विवादित ठरल्या आहेत. यापैकी शैलेश टेंभूर्णीकर यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच प्रशासकीय कारण पुढे करून त्यांना तडकाफडकी हटविण्यात आले आहे. शिवाय दुसरीकडे कल्याणकुमार यांना दुसऱ्यांदा गडचिरोली येथे पाठविण्यात आले.
माहिती सूत्रानुसार कल्याणकुमार यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात पाच वर्षे व चंद्रपूर येथे चार वर्षे काम केले आहे. असे असताना त्यांना पुन्हा गडचिरोली येथे पाठविण्यात आले असून, हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी अनेक आरोपांमुळे विवादित ठरलेले गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी यांना नागपूर मिळाले आहे. त्यांच्यासाठी हे बक्षीस असल्याचे बोलले जात आहे. टी. एस. के. रेड्डी यांनी शुक्रवारपासून नागपूरचा पदभार हाती घेतला आहे. तसेच जयोती बॅनजी यांनीही उपवनसंरक्षक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. या अनपेक्षित बदल्यांमुळे दुखावलेल्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी विमानतळावर थेट वनमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तसेच कल्याणकुमार यांची बदली रद्द करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याणकुमार यांनी यापूर्वी गडचिरोली व चंद्रपूर येथे काम केले असल्याचे वनमंत्र्यांना सांगून सध्या त्यांच्या मुलाची आॅर्थो ट्रीटमेंट सुरू असल्याने, त्यासाठी त्यांना नागपुरात राहणे आवश्यक असल्याचे पटवून देण्यात आल्याची माहिती आहे.
एम. एस. रेड्डी यांच्यावर एवढी कृपादृष्टी का?
दुसरीकडे या सर्व घडामोडीत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांना गत जुलै महिन्यातच तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असताना त्यांची कुठेही बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे एम. एस. रेड्डी यांच्यावर एवढी कृपादृष्टी का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. एम. एस. रेड्डी यांनी मागील तीन वर्षांत पेंच व्याघ्र प्रकल्पासह मानसिंगदेव, उमरेड-कऱ्हांडला, बोर व टिपेश्वर अभयारण्याचा कायापालट केला आहे. शिवाय त्यांची वन विभागात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात पी. कल्याणकुमार यांच्याऐवजी अशा धडाडीच्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे बोलले जात आहे. मात्र राज्य शासनाने त्यांना एक वर्षांची मुदतवाढ दिली असल्याची माहिती पुढे आली आहे.