अपंगांचे रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: December 10, 2014 00:44 IST2014-12-10T00:44:10+5:302014-12-10T00:44:10+5:30
विदर्भ विकलांग संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चाला दुसऱ्या दिवशी एकाही मंत्र्याने भेट न दिल्यामुळे संतापलेल्या अपंग बांधवांनी सायंकाळी ६ च्या सुमारास टेकडी रोडवर रास्ता रोको करून चक्काजाम केला.

अपंगांचे रास्ता रोको आंदोलन
वाहनांच्या रांगा : एकाही मंत्र्याने भेट न दिल्यामुळे संतप्त
नागपूर : विदर्भ विकलांग संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चाला दुसऱ्या दिवशी एकाही मंत्र्याने भेट न दिल्यामुळे संतापलेल्या अपंग बांधवांनी सायंकाळी ६ च्या सुमारास टेकडी रोडवर रास्ता रोको करून चक्काजाम केला. यामुळे मानस चौक ते मॉरेस कॉलेज टी पॉईटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अपंगांना विविध सवलती देऊन त्यांना व्यवसायासाठी आणि निवासासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, त्यांना रोजगारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज द्यावे, गटई कामगारांसारखे स्टॉल देण्यात यावे आदी मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर मोर्चा काढला होता. अपंग बांधवांचा मोर्चा टेकडी रोडवरून विधानभवनाकडे जात असताना त्यांना माहेश्वरी भवनाजवळ पोलिसांनी रोखले. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अपंग बांधवांच्या मोर्चाला भेट दिली. परंतु कुठलाच ठोस तोडगा न निघाल्यामुळे अपंग बांधवांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासून अपंग बांधवांनी भजन करून आपले आंदोलन सुरूच ठेवले. दिवसभरात एकही मंत्री त्यांच्या मोर्चाकडे न फिरकल्यामुळे सायंकाळी त्यांचा संयम सुटला. त्यांनी टेकडी रोडवर आपली तीनचाकी वाहने आडवी लावून रास्ता रोको केला. यामुळे मानस चौक ते मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अर्धा तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलविल्याशिवाय रास्ता रोको थांबणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यावर पोलिसांनी अर्ध्या तासात मंत्री महोदयांना बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले. (प्रतिनिधी)