महाराज बागेतील प्राण्यांना खेळण्यासाठी दगडांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 21:41 IST2020-02-27T21:40:54+5:302020-02-27T21:41:39+5:30
महाराज बागेतील पिंजऱ्यात असलेल्या वन्य प्राण्यांना खेळण्याबागडण्यासाठी या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने मोठाल्या दगडांची व्यवस्था केली आहे.

महाराज बागेतील प्राण्यांना खेळण्यासाठी दगडांचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराज बागेतील पिंजऱ्यात असलेल्या वन्य प्राण्यांना खेळण्याबागडण्यासाठी या प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने मोठाल्या दगडांची व्यवस्था केली आहे. वन्यजीवांना नैसर्गिक वातावरणाची अनुभूती यावी, यासाठी दगडांचा येथे वापर करण्यात आल्याचे महाराज बाग प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने म्हणणे आहे.
आज दुपारी जेसीबीच्या मदतीने मोठाल्या शिळा येथे आणण्यात आल्या. त्या पिंजऱ्याजवळ आणल्यावर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या आत टाकण्यात आल्या. निसर्गत: वन्यजीव उंचावर बसून टेहळणी करतात. हे लक्षात घेऊन प्राण्यांना या वातावरणाची अनुभूती यावी यासाठी या शिळा येथे रचून ढिगारा करण्यात आला. काही वेळाने पिंजऱ्यातील प्राण्यांनी त्यावर बसून आनंद घेतला. वन्यजीवांच्या पिंजऱ्याला नैसर्गिक रूप देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बिबट, कोल्हा आणि अस्वलांच्या पिंजऱ्यापासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
वन्यप्राण्यांच्या सुविधेसाठी पाऊल
महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचेप्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर म्हणाले, वन्यप्राण्यांची उंचावर बसण्याची नैसर्गिक वृत्ती लक्षात घेऊन हा प्रयोग केला आहे. वेटरनर ग्राउंडमध्ये मोठाले दगड पडलेले होते. तेच यात उपयोगात आणले आहेत. खासकरून मांजर प्रवर्गातील प्राण्यांसाठी हा अभिनव उपक्रम येथे केला असल्याचे त्यांनी सांगितले.