- आहारतज्ज्ञ अपूर्वा अग्रवाल यांनी दिला लठ्ठपणापासून मुक्तीचा मंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या शरिराला कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटिनसह सर्वच प्रकारच्या पोषणतत्त्वांची गरज असते. कमी खाल्ल्याने लठ्ठपणापासून मुक्ती मिळते, हा भ्रम असून, आपले पोटच आपल्या आहार संतुलनाचा प्रमुख ‘डायट गुरू’ असतो. तुम्हाला हव्या असलेल्या अन्नाची मात्रा पोट स्वत:च सांगत असते. कीटो, पैलियो, क्रैश यासारख्या डायटच्या फेऱ्यात न पडता सी ३ अर्थात सिंपल, सिझनल व सेंसिबल आहार घ्या, असा सल्ला ‘शिखा ए. शर्मा की फॅट टू स्लिम’च्या फ्रेंचायजी संचालक व आहारतज्ज्ञ अपूर्वा अग्रवाल यांनी दिला आहे.
‘लोकमत’सोबत झालेल्या विशेष संवादात अपूर्वा अग्रवाल यांनी ‘शिखा ए. शर्मा’ फ्रेंचायजी दुबई, न्यूयॉर्क, न्यू जर्सीसह देशातील अनेक शहरात कार्यरत असल्याचे सांगितले. २७ वी फ्रेंचायजी नागपुरात आहे. खाद्यसंस्कृती ही भारताचा प्रमुख भाग आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार खाद्यान्नाची चव व प्रकार बदलत जातात. अन्न सोडून वजन कमी करणे सोपे आहे. परंतु, त्यामुळे शरीर अशक्त होत जाते आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे, हा मार्ग टाळावा, असे अग्रवाल म्हणाल्या.
जंकफूड, पॅकेज्ड्, तेलकट पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे. आयुष्यभर कामी पडेल अशा तऱ्हेने आहारात बदल करावा. काही दिवसांसाठी जेवण न करणे म्हणजे शरिराचे नुकसान करणे होय. शरिराला ऊर्जा मिळेल, असाच आहार असावा. हेल्थ ॲपच्या कचाट्यात चुकूनही अडकू नका. त्या भरवशावर जीवनचक्रात बदल करत असाल, तर ते नुकसानदायकच ठरेल. फेसबुक, इन्स्टाग्रामवर फ्रेंचायजीची माहिती उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वभावानुसार जीवनशैलीत बदल करा
लठ्ठपणापासून मुक्तीसाठी कोणी येतो, तेव्हा सर्वप्रथम त्याचे २० मिनिटांपर्यंत समुपदेशन केले जाते आणि त्याचा आहार समजून घेतला जातो. त्याच्या खानपानावर आधारित सल्ला दिला जातो. प्रत्येक व्यक्तीसाठी फूड प्लॅन वेगवेगळा असतो. फॅट फ्री, कॅलरी फ्री खाद्यान्नासारख्या गोष्टी डोळ्यात धूळ फेकण्यासारखा विषय आहे.
हर्ब, स्पाईसेसमध्ये २००० फायटो न्युट्रिएण्ट्स तत्त्व
हर्ब, स्पाईसेसमध्ये २००० फायटो न्युट्रिएण्ट्स तत्त्व असतात. हे तत्त्व शरिराच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात. हर्ब, स्पाईसेसच्या ग्रहणाने रक्तदाब, मधुमेह आदी नियंत्रित ठेवता येतात. यात कॅलरी, सोडियम नसतात.
४ नंतर चहा-कॉफी पिऊ नये
दुपारी ४ ते सायंकाळी ७ च्या दरम्यानचा वेळ अतिशय महत्त्वाचा असतो. या वेळेत खूप भूक लागते. या काळात जे काही मिळेल ते खाण्याची इच्छा प्रबळ असते. मात्र, त्यामुळे, रात्रीचे जेवण प्रभावित होते. तेव्हा हलका आहार घेण्याची गरज आहे. सोबतच झोप अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच, दुपारी ४ नंतर चहा-कॉफी पिऊ नये. चहा-कॉफीमुळे झोप प्रभावित होत असते.
.......