टोलनाका लुटणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 02:47 IST2017-07-22T02:47:39+5:302017-07-22T02:47:39+5:30
सावनेर - नागपूर महामार्गावर पाटणसावंगी शिवारात असलेल्या टोल नाक्याच्या केबिनमधून चौघांनी साडेनऊ लाख रुपये लुटून नेल्याची घटना

टोलनाका लुटणाऱ्यांना अटक
सुपरवायझर निघाला सूत्रधार : ८ लाख १६ हजारांची रोख जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : सावनेर - नागपूर महामार्गावर पाटणसावंगी शिवारात असलेल्या टोल नाक्याच्या केबिनमधून चौघांनी साडेनऊ लाख रुपये लुटून नेल्याची घटना बुधवारी (दि. १९) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली होती. या चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य आरोपीसह अन्य तिघांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून ८ लाख १६ हजार ६४० रुपये रोख जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या टोलनाक्यावर सुपरवायजर म्हणून काम करणाराच या लुटमारीचा मुख्य सूत्रधार निघाला.
पराग ऊर्फ पिंटू डोमन राऊत (रा. वॉर्ड क्रमांक - ३, महादुला, कोराडी, ता. कामठी), मनोज किसन मानकर (२७, रा. वॉर्ड क्रमांक - २, हनुमान मंदिराजवळ, सुरादेवी, ता. कामठी), अनुभव कुर्वे, केटीपीएस कॉलनी, कोराडी, ता. कामठी व लोकेश इंगळे रा. धरमपेठ, नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघेही मित्र असून, पराग राऊत हा पाटणसावंगी शिवारातील टोल नाक्यावर सुपरवायजर म्हणून नोकरी करायचा. पराग त्याच्या तीन सहकाऱ्यांसह मोटरसायकलने टोलनाक्यावर हिशेबाची रक्कम मागण्यासाठी गेला होता. मात्र, कॅशियर संतोष रेडे यांनी त्याला रक्कम देण्यास नकार दिला.
परिणामी, पराग व त्याच्या साथीदारांनी संतोष रेडे यांच्यासोबत धक्काबुक्की केली आणि केबिनमधील कपाटाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडले. शिवाय, आत ठेवलेले नोटांचे बंडल बॅगमध्ये टाकून चौघांनीही लगेच नाक्यावरून पळ काढला. या प्रकरणी रेडे यांनी गुरुवारी दुपारी सावनेर पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदविली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लगेच या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. त्यातच पराग आणि मनोजला सुरुवातीला आणि अनुभव व लोकेशला नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून त्यांनी चोरून नेलेले ८ लाख १६ हजार ६४० रुपयेही जप्त केले.
ही कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, नीलेश बर्वे, प्रणयसिंग बनाफर यांच्या पथकाने पार पाडली.
२४ तासांच्या आत छडा
विशेष म्हणजे, ही घटना बुधवारी (दि. १९) मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी संतोष रेडे यांनी या घटनेची तक्रार गुरुवारी दुपारी नोंदविली. चोरांनी साडेनऊ लाख रुपये चोरून नेल्याचेही रेडे यांनी तक्रारीत नमूद केले होते. त्यामुळे सावनेर पोलिसांनी भादंवि ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेनेही या घटनेचा समांतर तपास सुरू केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परागला गुरुवारी (दि. २०) रात्री अर्थात २४ तासांच्या आत कोराडी परिसरात अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे लगेच मनोज, अनुभव आणि लोकेशलाही अटक केली.
आरोपींना पोलीस कोठडी
सावनेर पोलिसांनी चारही आरोपींना शुक्रवारी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील बाजू ऐकून घेत आरोपींना सोमवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी या टोलनाक्यावर येण्यासाठी चारचाकी वाहन वापरले होते, अशी माहिती नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांनी दिली. पोलिसांनी सदर वाहन अद्यापही जप्त केले नाही. आरोपी नाक्यावर शस्त्राविना लुटमार करण्यासाठी आले होते.