अजूनही बालविवाह

By Admin | Updated: April 5, 2017 02:13 IST2017-04-05T02:13:15+5:302017-04-05T02:13:15+5:30

सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला.

Still child marriage | अजूनही बालविवाह

अजूनही बालविवाह

तीन वर्षात आठ गुन्हे दाखल : बालकांच्या संरक्षणाची यंत्रणा हरविली कुठे ?
मंगेश व्यवहारे   नागपूर
सावित्रीबाई, जोतीबा फुले यांच्यापासून अनेक महापुरुषांनी बालविवाहासारख्या कुप्रथेला मूठमाती देण्यासाठी संघर्ष केला. आज महाराष्ट्र शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात प्रगती करतो आहे. मोबाईलवर एक क्लीक करून जग जवळ आणणारा हा आधुनिक काळ, मात्र या काळात पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह होत आहेत. तेही स्मार्ट सिटीची बिरुदावली मिरवणाऱ्या नागपूर शहरात ही कुप्रथा जन्म घेत असेल तर याला सामाजिक व सांस्कृतिक अधोगती म्हणावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. होय, नागपूर शहरात गेल्या तीन वर्षात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत.
हा धक्कादायक खुलासा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाकडून केला गेला आहे. कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बालविवाहाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. यात धंतोली ठाण्यात दोन, कोतवालीमध्ये एक, नंदनवन एक, कामठी एक, जरीपटका एक व यशोधरानगर ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. बालविवाहास गरिबी, आमिष व लहान वयात मुलांमध्ये पे्रमाबाबत वाढते आकर्षण या गोष्टी कारणीभूत ठरत आहे. परंतु बाल विवाहाच्या रोकथांबसाठी तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. परंतु या यंत्रणा बालविवाह या विषयावर फारशा गंभीर दिसत नाही. त्यामुळे समाजात बालविवाह होत असतानाही बरेचदा त्या सामोर येत नाही. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मध्ये दंडात्मक आणि न्यायालयीन शिक्षेचीसुद्धा तरतूद आहे. आज समाज पुढारलेला आहे, शिक्षित झाला आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक कायदे बनलेले आहे, असे असतानाही नागपूरसारख्या शहरात बालविवाह होणे दु:खद बाब आहे.
नुकताच २५ मार्च रोजी यशोधरानगर ठाण्यात पुन्हा बालविवाहाचा गुन्हा दाखल झाला. चाईल्ड लाईन या संस्थेद्वारे जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी बालविवाह झालेल्या मुलीला आरोपींच्या घरातूनच ताब्यात घेतले. तिला शासकीय मुलींचे बालगृह येथे ठेवण्यात आले आहे.

बालविवाहाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. स्लममध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यावर रोखथांब करण्यासाठी शासनाने ज्या यंत्रणांना जबाबदारी दिली आहे, त्यांनी समन्वय साधून काम केल्यास आजही घडणाऱ्या बालविवाहासारख्या प्रकाराला आळा घालता येईल. पुढे आलेल्या या घटना केवळ जिल्हा बाल संरक्षण कक्षामुळे आल्या आहेत.
- मुस्ताक पठाण,
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
 

Web Title: Still child marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.