नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:17 IST2018-04-19T22:17:25+5:302018-04-19T22:17:38+5:30
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीला नगर परिषदेचा दर्जा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला असून शासनाने नागरिकांची ही मागणी पूर्ण करीत या ठरावला मान्यता दली. यामुळे आता बुटीबोरी शहर व त्याअंतर्गत येत असलेल्या गावांना नगर परिषदेमार्फत नागरी सुविधा पुरविल्या जातील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करीत ही मागणी पूर्ण केली आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. बुटीबोरी ग्रामपंचायतीत बुटीबोरी, रेंगापार, बोरखेडी (फाटक) या गावांचा समवेश होता. ग्रामपंचायत बुटीबोरीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली होती. बुटीबोरी ग्रामपंचायतीनेही नगर परिषदेचा दर्जा देण्याचा ठराव पारित केला आहे. तसेच बुटीबोरी शेजारील कृषिदेव कारखान्याच्या भागाचे मतदान बुटीबोरीत असल्याने तो भागही ग्रामपंचायत बुटीबोरी समाविष्ट करण्यास हरकत नाही, असा ठरावही ग्रामपंचायतीत पारित झाला होता.
बुटीबोरी ग्रामपंचायतीची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये रस्ते, वीज, पाणी, नाली, शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत बुटीबोरी क्षेत्राला नगर परिषदेचा दर्जा देण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी ३ आॅगस्ट २०१७ च्या पत्रातून केली आहे.
जिल्हाधिकाºयांनी केलेली शिफारस लक्षात घेता बुटीबोरी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ३ चे पोटकलम (२) (२ क) (३) च्या तरतुदींची पूर्तता होत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता घेऊन शासनाच्या मान्यतेने २९ हजार लोकसंख्या असलेल्या बुटीबोरी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बुटीबोरी नगर परिषदेची रचना होईपर्यंत सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहे.
पत्रपरिषदेला आ. समीर मेघे, आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.