महापुरुषांचे पुतळे धूळ आणि कचरा मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:39+5:302021-01-13T04:16:39+5:30
शहीद स्मारक येथे सिटिझन्स फोरमचे श्रमदान : ‘स्वच्छ नागपूर, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहर ...

महापुरुषांचे पुतळे धूळ आणि कचरा मुक्त
शहीद स्मारक येथे सिटिझन्स फोरमचे श्रमदान : ‘स्वच्छ नागपूर, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेचीच जबाबदारी नाही तर नागरिकांचेही ते कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून नागपूर सिटिझन्स फोरमने ‘स्वच्छ नागपूर, माझी जबाबदारी’ हे अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून शहरातील दुर्लक्षित पुतळ्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधले आहे. रविवारी फोरमच्या युवा सदस्यांनी मॉरिस कॉलेज टी पॉईंट चौकातील शहीद स्मारक येथील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून या अभियानाला सुरुवात केली. या अभियानांतर्गत नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे फोटो पाठविण्याचे आवाहन केले आहे.
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या नागपूर व विदर्भातील शहिदांचे सुंदर स्मारक नागपुरात साकारण्यात आले आहे. मात्र, मनपाचे दुर्लक्ष झाल्याने या स्मारकात कचरा आणि धूळ साचली होती. फोरमच्या सदस्यांनी सर्फ आणि स्वच्छ पाण्याने हा परिसर स्वच्छ करून पुतळ्यावर साचलेली धूळ साफ केली. शहिदांच्या पुतळ्यांवर माल्यार्पण केले. यावेळी स्वच्छता अभियान प्रमुख अभिजित सिंह चंदेल, अमित बांदूरकर, अभिजित झा, गजेंद्रसिंग लोहिया, प्रतीक बैरागी, वैभव शिंदे पाटील, अंकुर देशमुख, स्वप्निल पोहणे, गोपाल सिंग, ओम राजपूत, राहुल बैरागी, प्रवीण बैरागी व संकेत महल्ले आदी सदस्य उपस्थित होते.
....
महापौर व आयुक्तांना फोरमचे चॅलेंज
केवळ राजकारणासाठी पुतळ्यांचा वापर करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी पुतळ्यांच्या दुरावस्थेकडेही लक्ष द्यावे. महापौर व मनपा आयुक्तांनी शहरातील महापुरुषांचे पुतळे व स्मारकांच्या नियमित स्वच्छतेसाठी योजना आखून तातडीने अंमलबजावणी करावी. महापौर व आयुक्तांनी पुतळ्यांची स्वच्छता चॅलेंज म्हणून स्वीकारावे, असे आवाहन सिटिझन्स फोरमच्या स्वच्छता अभियानाचे प्रमुख अभिजित सिंह चंदेल यांनी केले आहे. मनपाने पुढाकार न घेतल्यास फोरम शहरातील सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे ते म्हणाले.
....
स्मारक व पुतळ्यांची देखभाल करावी
अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांना तडे गेले आहेत शिवाय अनेक ठिकाणी पुतळ्यांच्या चबुतऱ्यांची मनपाने तातडीने डागडुजी करण्याची गरज असल्याचे अमित बांदूरकर म्हटले आहे.